१ ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
st smart card महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवर्गांतील प्रवाशांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या शासकीय सवलतींचा लाभ आता स्मार्ट कार्डद्वारेच घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून १ ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत सुमारे दोन लाख प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढले असल्याची माहिती आहे.
 

st smart card mandatory from october 1 for travel concessions in maharashtra 
 
 
 
एसटी महामंडळाने यापूर्वी १ सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कार्ड काढणे, रिचार्ज करणे आणि ॲक्टिव्हेशनच्या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे सुरुवातीला १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणी कायम राहिल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. आता १ ऑक्टोबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे.एसटी महामंडळाकडून मागील तीन महिन्यांपासून प्रवाशांना स्मार्ट कार्ड काढण्याचे आवाहन केले जात आहे. स्मार्ट कार्डच्या रिचार्जची प्रक्रिया नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) सर्व्हरशी जोडलेली आहे. मात्र, सर्व्हरमध्ये तांत्रिक अडथळे निर्माण होत असल्याने रिचार्ज आणि ॲक्टिव्हेशन करताना प्रवाशांना अडचणी येत आहेत. काही प्रवाशांनी कार्ड काढले असतानाही रिचार्ज किंवा ॲक्टिव्हेशन पूर्ण करण्यासाठी वाहकांची मदत घ्यावी लागत असल्याचे सांगितले आहे.स्मार्ट कार्डमध्ये आवश्यक रक्कम रिचार्ज केल्यानंतर पात्र प्रवासासाठी संबंधित सवलत मिळणार आहे. मात्र, सर्व्हरवरील तांत्रिक अडचणींमुळे रिचार्ज प्रक्रिया संथ होत असल्याने बसस्थानकावर किंवा बसमध्ये वाहकाकडून रिचार्ज करून घेण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.महिलांसाठी एसटीच्या प्रवासी भाड्यात सरकारने ५० टक्के सवलत जाहीर केल्यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट कार्ड सक्तीमुळे महिलांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. वर्षातून एखाद-दुसऱ्यांदा एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांनाही सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास स्मार्ट कार्ड काढावे लागणार आहे.
 
 
दरम्यान, st smart card गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या छत्रपती संभाजीनगर विभागातील ३०७ एसटी बस पुन्हा विभागात परतल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त वाहतूक व्यवस्था करण्याच्या उद्देशाने या बस पाठवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवाचा कालावधी संपल्यानंतर त्या परतल्याने नियमित मार्गांवरील एसटी वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.
 
१ ऑक्टोबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक असल्याने पात्र प्रवाशांनी त्याची प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक असल्याचे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी स्पष्ट केले आहे.