मानोरा,
stray dogs शहरातील गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये सध्या अधिकारी, कर्मचार्यांपेक्षा भटक्या श्वानांचा मुक्त वावर वाढला असून, कामकाजाच्या वेळेतच या कुत्र्यांनी सरकारी कार्यालयात ठिय्या मांडल्याचे समोर आले आहे. या कुत्र्यांकडून एखाद्या नागरिकाला चावा घेतला गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

२४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात तीन भटके कुत्रे भर दुपारी कार्यालयीन वेळेत निवांत झोपलेले आढळुन आले. ज्या ठिकाणी नागरिक बसतात, ज्या भिंतीवर शासनाच्या योजना, तक्रार पेटी, भारतीय दंड संहितेची माहिती लावली आहे, त्याच ठिकाणी कुत्र्यांनी आपला अड्डा बनवला आहे. तहसील कार्यालयाप्रमाणेच मानोरा पोलिस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय या सर्वच ठिकाणी नागरिकांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. महिला, लहान मुले, वृद्ध, शेतकरी आपल्या कामासाठी येत असतात. मात्र, याच सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे मानोरा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए देखील या भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षित नाही. महामार्गावर टोळक्याने फिरणार्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस मोहीम राबवलेली नाही. सरकारी कार्यालयांमधे नेमणुकीला असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचे लक्ष नसल्याने कुत्रे थेट कार्यालयाच्या आत घुसतात आणि व्हरांड्यातच झोपतात. स्वच्छता विभागाचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.stray dogs भटक्या कुत्र्यांमुळे रेबीजसारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी सबंधित कार्यालयाचे प्रमुख अधिकारी घेतील का? असा सवाल नागरिक करीत आहेत. तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांनी संयुक्तपणे या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून शहरातील व सरकारी कार्यालयातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.