भीषण अपघात! डंपरला कार धडकून मुंबईतील चौघांचा जागीच मृत्यू

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
सुरत
surat highway accident राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह सुरू असतानाच गुजरातमधून काळीज पिळवटून टाकणारी अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईहून गुजरातमधील शंखेश्वर रायजी मंदिरात देवदर्शनासाठी निघालेल्या कारची महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात मुंबईतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी तीव्र होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
 

surat highway accident 
ही दुर्घटना शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सकाळी सुमारे ८ वाजता सुरत जिल्ह्यातील कामरेज तालुक्यातील ‘भारतमाला एक्सप्रेसवे’वर घडली. मुंबईतील एक कुटुंब चारचाकीने शंखेश्वर रायजी मंदिराकडे जात होते. भरधाव वेगाने कार महामार्गावरून जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरचा चालकाला वेळेत अंदाज आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारचालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच कार डंपरच्या मागील बाजूवर जोरात आदळली.
धडकेनंतर कार थेट डंपरखाली घुसली. त्यामुळे कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सुरत जिल्हा वाहतूक पोलीस उपनिरीक्षक (PSI) ईश्वर सिंग सिसोदिया यांनी या अपघाताची माहिती दिली.
अपघाताची तीव्रता पाहूनsurat highway accident  महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सुरत जिल्हा वाहतूक पोलीस, कामरेज पोलीस आणि हायवे पेट्रोलिंग पथक घटनास्थळी दाखल झाले. कारचा पूर्णपणे चुराडा झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कामरेज सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) पाठवण्यात आले.
या दुर्घटनेत राजीव जितेंद्र जैन (चालक), जयंतिलाल चुनीलाल दोशी, प्रवीण जैन आणि संजय खेमचंद यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कामरेज पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.