वाशीम,
cutting down tree शहरातील अनधिकृत वृक्षतोडीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वाशीम नगरपरिषदेच्या स्थानिक वृक्ष प्राधिकरण समितीने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. विनापरवाना वृक्षतोड केल्यास आता प्रति झाड १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या दालनात वृक्ष प्राधिकरण समितीची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या बैठकीस मुख्याधिकारी तथा समिती अध्यक्ष अरविंद मुंडे, वृक्ष अधिकारी स्वप्निल इंगोले व समिती सदस्य उपस्थित होते. सिव्हिल लाइन्स (अयोध्या नगरी) परिसरातील अनधिकृत वृक्षतोडीच्या तक्रारींची दखल घेत ही दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात आली. पुन्हा असा प्रकार घडल्यास दंड अधिक कठोर केला जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. याशिवाय, वाशीम शहरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल वृक्षगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. तसेच पुसद नाका व अकोला नाका येथील पिंपळाची झाडे रस्त्याच्या कामात बाधित होत असल्यास त्यांची तोड न करता शास्त्रीय पद्धतीने पुनरोपण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.cutting down tree नागरिकांनी शहरातील हिरवळ जपण्यासाठी सहकार्य करावे व विनापरवाना वृक्षतोड करू नये, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगराध्यक्ष तथा समिती सदस्य अनिल केंदळे, वृक्ष अधिकारी तथा समिती सचिव स्वप्निल इंगोले यांच्यासह समिती सदस्य संतोष मुरकुटे, राजू वानखेडे, संतोष वानखेडे, योगेश सराफ, वृषाली टेकाडे, डॉ. जगदीश बोरा, डॉ. अमित चव्हाण, गजानन काशिराम दहात्रे, भानुप्रतापसिंह ठाकूर, अनिल ताजणे, साबीर बेग मिर्झा, पुरणचंद बदलाणी, सद्दामभाई, भावेश गोरे उपस्थित होते.
वाशीम शहरातील वृक्षसंपदा ही शहराची नैसर्गिक संपत्ती आहे. नागरिकांनीही वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे आणि कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना वृक्षतोड करू नये, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल केंदळे यांनी केले आहे.