मुंबई,
Two killed in toxic gas leak in Goregaon गणपती विसर्जनानंतर गोरेगावच्या राम मंदिर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. प्रभाकर धनिवर (वय 24) आणि भाविक देसाई (वय 18) अशी मृत तरुणांची नावे आहेत. राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळील शिवशंकर चाळीतील सार्वजनिक शौचालयात ही घटना घडली. शौचालयाच्या शेजारी असलेल्या कारखान्यात अॅसिडचा वापर केला जात असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कारखान्यातील रासायनिक पदार्थ सांडपाण्याच्या ड्रेनेजमध्ये सोडण्यात आल्याने त्यातून विषारी वायू तयार झाला आणि तो ड्रेनेजच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालयात पोहोचला. याचदरम्यान प्रभाकर आणि भाविक शौचालयात गेले. बराच वेळ दोघे बाहेर न आल्याने गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आत जाऊन पाहिले असता दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. परिसरात रासायनिक पदार्थाचा तीव्र दुर्गंधही जाणवत होता.
दोघांना तातडीने जोगेश्वरी ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित कारखाना मालकावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. वनराई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कायदेशीर कारवाई केली जात आहे. खासदार रविंद्र वायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अनधिकृत केमिकल कारखाने तसेच त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, दोन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.