विराटचा विक्रमांचा ‘विराट’ प्रवास सुरूच!

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
तिरुवनंतपुरम,
virat-kohli वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच विराट कोहलीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. २७ सप्टेंबर रोजी ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध ४४वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्यामुळे त्याने भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा तब्बल २८ वर्षांपासून कायम असलेला विक्रम मागे टाकला. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा भारतीय खेळाडू म्हणून आता कोहलीच्या नावाची नोंद झाली आहे.
 
virat-kohli
 
यापूर्वी हा विक्रम अझरुद्दीन यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ४२ एकदिवसीय सामने खेळले असून ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राहुल द्रविड यांनी ४०, तर एम.एस. धोनी आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी ३९ सामने खेळले आहेत. मात्र, कोहलीचा विक्रम इथेच थांबणार नाही. सध्याच्या मालिकेतील तिन्ही सामने खेळल्यास त्याच्याकडे वेस्ट इंडिजविरुद्ध ४६ एकदिवसीय सामने पूर्ण होतील आणि तो वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार शिवनारायण चंदरपॉल यांच्या विक्रमाची बरोबरी करेल. चंदरपॉल यांनी १९९४ ते २००९ या कालावधीत भारताविरुद्ध ४६ एकदिवसीय सामने खेळले होते.
 
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानचे जावेद मियांदाद आणि वसीम अक्रम आघाडीवर आहेत. दोघांनीही कॅरिबियन संघाविरुद्ध प्रत्येकी ६४ सामने खेळले आहेत. त्यामुळे कोहलीसमोर पुढील काळात या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी आहे.
 
कोहलीच्या फलंदाजीकडेही या सामन्यात विशेष लक्ष आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नऊ शतके झळकावली आहेत. त्यामुळे पहिल्याच सामन्यात शतक झळकावल्यास वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० शतके करणारा तो पहिला फलंदाज ठरेल. याशिवाय कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून केवळ ५९ धावा दूर आहे. त्याने आतापर्यंत ३१४ एकदिवसीय सामन्यांत १४ हजार ९४१ धावा केल्या आहेत. आणखी ५९ धावा केल्यास १५ हजार एकदिवसीय धावा पूर्ण करणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा जगातील दुसरा फलंदाज ठरेल.