वर्धा,
wardha-droughtएलनिनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकर्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन भेट दिली. पीक पाहणी सोबतच शेतकर्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, अतिरित जिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, पशुसंवर्धनचे उपायुत डॉ. जगदीश बुकतरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे उपस्थित होते.
देवळी तालुयातील रत्नापूर येथील महिला शेतकरी सुमित्रा नाडे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. पावसाचा खंड आणि पुरेसा पाऊस झाला नसल्याने सोयाबीनचे दाणे भरलेले नाही. त्यामुळे सरासरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
शासनाने दुष्काळी तालुयांची यादी जाहीर केली. शेतकर्यांना दुष्काळी मदत, नुकसान भरपाई मिळण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी, ई-पीक पाहणी महत्वाची आहे. त्यामुळे पीक पाहणी ऑनलाईनसह, ऑफलाईन करण्याची सुविधा देखील शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकर्यांची पीक पाहणी तातडीने पूर्ण करा, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी केल्या.
प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्यास याचा फायदा होण्यासाठी पंचनामे अचूक आणि तातडीने पूर्ण करा. पंचनामे संयुत आणि शेतकर्यांच्या उपस्थितीत करा. ग्रामसभेसमोर पंचनामे ठेवा, संबंधित शेतकर्यांना दाखवा, नंतर शेतकर्यांच्या तक्रारी येणार नाही, याची दक्षता घ्या. दुष्काळी स्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्याचे शासनाचे धोरण आहे. स्वत: मुख्यमंत्री शेतकर्यांच्या बांधावर जात आहे. लवकरच शेतकर्यांना प्रत्यक्ष मदत दिली जाईल. केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाने मदतीचे धोरण स्वीकारले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे खर्चाची काटकसर करून मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.