रोहित-विराट करणार विक्रमांची बरसात?

सचिनचे दोन रेकॉर्डही निशाण्यावर

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
rohit-and-virat वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघातील अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. दोन्ही फलंदाजांचा कॅरेबियन संघाविरुद्धचा वनडे रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्यामुळे मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्यांच्यासमोर अनेक वैयक्तिक विक्रम रचण्याची संधी आहे. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 2261 धावा केल्या असून त्याच्या नावावर 9 शतकं आहेत. दुसरीकडे रोहित शर्माने या संघाविरुद्ध 1613 धावा केल्या आहेत. या मालिकेत दोघांना मिळून सहा मोठे विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
 
rohit-and-virat
 
विराट कोहली सध्या वनडे कारकिर्दीत 302 डावांमध्ये 14,941 धावांवर आहे. 15 हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ 59 धावांची आवश्यकता आहे. हा टप्पा पूर्ण केल्यास वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर असून त्यांनी 377 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. विराटला मात्र आपल्या 303 व्या डावातच हा टप्पा गाठण्याची संधी आहे. याशिवाय विराटने श्रीलंकेविरुद्ध 10 वनडे शतकं केली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्या नावावर 9 शतकं असून आणखी एक शतक झळकावल्यास दोन वेगवेगळ्या संघांविरुद्ध प्रत्येकी 10 किंवा त्याहून अधिक वनडे शतकं करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरू शकतो. लिस्ट-ए क्रिकेटमध्येही विराटच्या नावावर 59 शतकं आहेत. सचिन तेंडुलकर यांनी 60 शतकं केली असून वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावल्यास विराट या विक्रमाची बरोबरी करेल.
 
रोहित शर्मालाही या मालिकेत महत्त्वाचे टप्पे गाठण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 280 डावांमध्ये 11,895 धावा केल्या असून 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी 105 धावांची गरज आहे. ही कामगिरी केल्यास 12 हजार किंवा त्याहून अधिक वनडे धावा करणारा रोहित भारताचा तिसरा फलंदाज ठरेल. यापूर्वी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी हा पराक्रम केला आहे. सलामीवीर म्हणूनही रोहितच्या नावावर 280 डावांत 9,865 धावा आहेत. 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 135 धावा आवश्यक आहेत. हा विक्रम केल्यास सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या आणि ख्रिस गेल यांच्या विशेष यादीत रोहितचा समावेश होईल. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजार चौकार पूर्ण करण्यासाठी रोहितला आणखी 18 चौकारांची गरज आहे. त्याने ही कामगिरी केल्यास 2 हजार किंवा त्याहून अधिक चौकार मारणारा तो भारताचा सहावा फलंदाज ठरेल.