सांस्कृतिक गणेशोत्सवात ५५० मंडळांचा सहभाग

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
नागपूर,
550 ganesh mandals गणेशोत्सवाच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित सांस्कृतिक गणेशोत्सवाला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील तब्बल ५५० गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यात ५४ ढोल-ताशा पथकांमधील तब्बल ३ हजार ७४० वादकांनी पारंपरिक वादन सादर करत गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित केला. याशिवाय सुमारे ८०० कलाकारांनी विविध कला सादर करून नागपूरकरांचे मनोरंजन केले.
 

550 ganesh mandals participate in cultural ganesh festival in nagpur 
गणेश मंडळांच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून यंदा ढोल-ताशा पथकांसाठी विशेष नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याला पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक ढोल-ताशा वादनामुळे गणेशोत्सवाच्या मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
महोत्सवात भक्तिसंगीत, सुगम संगीत, देशभक्तिपर गीते, हास्य कविसंमेलन, जागरण, गोंधळ, कीर्तन, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रयोग, नाट्यप्रयोग, नकला, गीत रामायण, जादूचे प्रयोग, रांगोळी व मेंदी प्रशिक्षण वर्ग, कथाकथन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून ८०० कलाकारांनी आपली कला सादर केली.खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने स्थानिक गणेश मंडळे, ढोल-ताशा पथके, वादक आणि कलाकार यांना यानिमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे यंदाचा सांस्कृतिक गणेशोत्सव हा नागपूरच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविणारा ठरला.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, डॉ. दीपक खिरवडकर, अशोक मानकर, दिलीप जाधव यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.