भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

देवरी तालुक्यातील हरदोली परिसरातील घटना

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
गोंदिया, 
Accidentसालेकसा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवरी तालुक्यातील हरदोली येथे सोमवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. गंगाराम नथुराम टेंभुर्णीकर (५४) रा. हरदोली, ता. देवरी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
 
 
acc
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम टेंभुर्णीकर हे आपल्या मित्रासोबत दुचाकी क्रमांक एमएच ३५ ए.क. ३३७३ वरून हरदोली येथील चौकात फिरण्यासाठी आले होते. दरम्यान, सकाळी ८ वाजताच्या सुमारास दोघांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून गप्पा मारत असताना आमगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या चारचाकी वाहन क्रमांक एमएच ४० सी.ए. ०७१६ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली.
 
 
धडक इतकी भीषण होती की, गंगाराम टेंभुर्णीकर हे दुचाकीसह अंदाजे दहा फूट अंतरावर फेकले गेले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती सालेकसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सालेकसा येथे हलविण्यात आला. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.