अभिनेत्रीला देहव्यापाराच्या आरोपावरून अटक

दोन तरुणींची पोलिसांकडून सुटका

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
ठाणे
actress arrested वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये देहव्यापाराचे रॅकेट चालवल्याच्या आरोपावरून ठाणे गुन्हे शाखेने मनोरंजन क्षेत्रातील एका अभिनेत्रीला अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईत दोन तरुणींचीही सुटका करण्यात आली. आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणींना नोकरी आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापारात ढकलले जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
 

actress arrested in thane prostitution racket case, two women rescued by police 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली अंधाळे यांना एका खबऱ्यामार्फत या प्रकरणाची माहिती मिळाली होती. ठाणे पश्चिमेतील वागळे इस्टेटमधील पडवळ नगर परिसरात ॲमफोटेक पार्कजवळ असलेल्या ‘हॉटेल साई टच रेस्टॉरंट अँड बार’ येथे मनोरंजन क्षेत्रात काम करणारी एक अभिनेत्री तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजता पोलिसांच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचला.
आरोपी अभिनेत्री हॉटेलमध्ये पोहोचताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. याच कारवाईदरम्यान हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली. दोन्ही तरुणींना पुढील पुनर्वसनासाठी सरकारी पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले असून, तेथे त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.
तपासादरम्यान आरोपी अभिनेत्रीने यापूर्वी ‘द अनवॉन्टेड गिफ्ट’ (The Unwanted Gift) आणि ‘जिल्हा गिरिडीह’ (Zila Giridih) या चित्रपटांमध्ये भूमिका केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय तिने सुमारे तीन भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘तू देख मेरी फोटो’ (Tu Dekh Meri Photo), ‘बंद दरवाजा’ (Band Darwaza), ‘छू ले जरा’ (Chhu Le Zara) आणि ‘तलब उल्लू’ (Talab Ullu) यांसारख्या वेब सिरीजमध्येही तिच्या भूमिका असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या आरोपानुसार, actress arrested  आरोपी महिलेने मनोरंजन क्षेत्रातील आपल्या संपर्कांचा वापर करून आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणींना रोजगाराचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना वेश्याव्यवसायात ओढून त्यांचे शोषण केले जात असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेकडून सुरू असून, रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.