आजपासून सुरू होणारा बँक संप टळला!

IBA-युनियनच्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Bank strike averted बँक कर्मचाऱ्यांकडून २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुकारण्यात आलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) रविवार, २७ सप्टेंबर रोजी यासंदर्भात घोषणा केली. इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) कर्मचारी संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.रविवारी रात्री ९.३० वाजता IBA आणि UFBU यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या चर्चेत बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्यासह सर्व शनिवारी सुट्टी देण्याची मागणी तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर या मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी IBA आणि UFBUच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे ठरले.
 
 
kajs
 
सर्व शनिवारी बँकांना सुट्टी देण्याच्या मागणीचा ही समिती अभ्यास करणार आहे. त्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करण्याबरोबरच संबंधित सर्व घटकांशी चर्चा केली जाणार आहे. बँक ग्राहकांच्या हिताचाही विचार करून सर्वांसाठी व्यवहार्य तोडगा काढण्यावर समितीचा भर राहणार आहे.बँक कर्मचारी संघटना गेल्या काही काळापासून आठवड्यात पाच दिवस कामकाज आणि दोन दिवस साप्ताहिक सुट्टीची मागणी करत आहेत. सध्या देशातील बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. मात्र, सर्व शनिवारी सुट्टी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मार्च २०२४ मध्ये झालेल्या वेतन करारातही या मागणीचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याबाबत पुढील कार्यवाही अद्याप प्रलंबित होती.
 
 
 
दरम्यान, बँक अधिकाऱ्यांसाठीच्या परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह अर्थात PLI योजनेचाही मुद्दा चर्चेत आला आहे. स्केल IV आणि त्यापुढील अधिकाऱ्यांसाठी PLI योजना लागू करण्याबाबत UFBUने भूमिका मांडली आहे. आता या विषयावर IBAसोबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारकडे कोणताही प्रस्ताव पाठवण्यापूर्वी योजनेतील आपल्या चिंता दूर करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात यावेत, अशी संघटनांची मागणी आहे.८ मार्च २०२४ रोजी झालेल्या चर्चेच्या इतिवृत्तात नमूद असलेल्या इतर प्रलंबित मुद्द्यांवरही IBA आणि बँक संघटनांमध्ये चर्चा होणार आहे. उर्वरित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यावर या चर्चेचा भर असणार आहे.
 
 
तीन दिवसांचा संप स्थगित झाल्याने आता सोमवार, २८ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबरपर्यंत देशभरातील बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. हा संप २८ सप्टेंबरपासून सुरू होणार होता आणि बँकांच्या सहामाही क्लोजिंगच्या काळातच त्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यातच शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्टीनंतर संप सुरू होणार असल्याने ग्राहकांच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. प्रस्तावित संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या घोषणेनंतर रविवार, २७ सप्टेंबर रोजी अनेक सरकारी बँकांच्या शाखा ग्राहकांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांना संपापूर्वी आवश्यक बँकिंग कामे पूर्ण करता आली. आता सर्वांचे लक्ष IBA आणि बँक युनियनच्या उच्चस्तरीय समितीच्या पुढील चर्चेकडे लागले आहे. यात पाच दिवसांचा बँकिंग वर्किंग वीक, सर्व शनिवारी सुट्टी, PLI योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांवर पुढील निर्णय होणार आहे.