पुणे
divya shinde ‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेला एका सेवानिवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड आणि पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दिव्या शिंदेसह तिच्यासोबत असलेल्या व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे सेवानिवृत्त सरकारी डॉक्टर असून ‘करुणादीप फाउंडेशन’चे सदस्य आहेत. संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी दिव्या शिंदेला निमंत्रण देण्यात आले नव्हते. मात्र, ती या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून कार्यक्रमात तिचा उल्लेख करण्यात आला. आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाल्याचा दावा करत तिने पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
डॉ. गायकवाड यांनी दिव्या शिंदेला ऑनलाइन ५० हजार रुपये पाठवले. मात्र, त्यानंतरही तिने आणखी पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिव्या शिंदे काही व्यक्तींसह डॉ. गायकवाड यांच्या निवासस्थानी गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तक्रारीनुसार, यावेळी डॉ. गायकवाड divya shinde यांना काठी आणि बेल्टने मारहाण करण्यात आली. त्यांच्यासोबत आलेल्या काही व्यक्तींनी घरातील वस्तूंची तोडफोड केल्याचाही आरोप आहे. तसेच, पाच लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर काळेपडळ पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून दिव्या शिंदेला अटक केली आहे. तिच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींचीही चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमका क्रम आणि संबंधितांची भूमिका तपासली जात आहे.
दरम्यान, दिव्या शिंदे यापूर्वी ‘बिग बॉस मराठी’मुळेही चर्चेत आली होती. सोशल मीडिया रील्सच्या माध्यमातून ती प्रकाशझोतात आली होती. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहस्पर्धकांना धमकावल्याच्या गंभीर आरोपांनंतर फेब्रुवारी २०२६मध्ये तिची कार्यक्रमातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. आता सेवानिवृत्त सरकारी डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड आणि खंडणी मागितल्याच्या आरोपामुळे तिचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.या प्रकरणाची काळेपडळ पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची चौकशी आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.