मुंबई
ramesh mhatre डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने म्हात्रे यांना दिलेला जामीन रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना तीन दिवसांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी बाजू मांडली. संबंधित खटला दंडाधिकारी न्यायालयात चालणारा असून, मुख्य आरोपातील कमाल शिक्षा पाच वर्षांची असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. या प्रकरणातील दोन साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या असून, तक्रारदार महिला डॉक्टरांची साक्ष ३ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली. म्हात्रे यांनी यापूर्वी काही काळ कोठडीत घालवला असून, ते न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करत असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
मात्र, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. यापूर्वीही या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांकडे गांभीर्याने पाहण्याची भूमिका न्यायालयाने मांडली होती.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने म्हात्रे यांच्या विरोधातील अन्य प्रकरणांचाही उल्लेख सुनावणीदरम्यान केला. त्यावर त्यांच्या वकिलांनी १९ पैकी १८ प्रकरणांत म्हात्रे निर्दोष सुटल्याचा दावा केला. या प्रकरणांशी संबंधित नोंदी सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी म्हात्रे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत जामिनावर हस्तक्षेप केला होता. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने काही कठोर अटींसह म्हात्रे यांना जामीन मंजूर केला होता. त्यांना महाराष्ट्राबाहेर राहण्यासह तपास आणि खटल्यासंदर्भात काही अटी घालण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र सरकारने उच्च ramesh mhatre न्यायालयाच्या या जामीन आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणीनंतर आता सर्वोच्च न्यायालयाने म्हात्रेंना तीन दिवसांत शरण येण्याचे निर्देश दिल्याने डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणाला महत्त्वाचे कायदेशीर वळण मिळाले आहे.