मुख्य निवडणूक आयुक्तांवर एफआयआर नोंदवा

संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
गोंदिया, 
gondia-congress-drought-marchमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी त्याचबरोबर संपूर्ण गोंदिया तालुक्यासह उर्वरित ७ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावेत तसेच खरीप पिकांना तात्काळ बोनस जाहीर करावा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी २८ सप्टेंबर गोंदिया शहरात मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
 
 
gonn
काँग्रेस नेत्यांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली. गोंदिया जिल्ह्यात सध्या शेतीचे मोठे संकट निर्माण झाले असून शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्यांना शासनाकडून तात्काळ आणि थेट मदतीची गरज आहे. यापूर्वीही गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्‍यांनी बोनस, पीक नुकसानभरपाई आणि इतर कृषीविषयक मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे.
 
 
मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसने आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयुक्तांवर कारवाईची मागणी लावून धरली आहे. यावेळी मोर्चात खासदार प्रशांत पडोळे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अमर वराडे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, नगराध्यक्ष सचिन शेंडे, छोटू बिसेन, विजय फुंडे, नगर पंचायत उपाध्यक्ष मलेशाम येरोला, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.