गोविंदा-सुनिता पुन्हा एकत्र?

विमानतळावरील व्हिडीओने चर्चेला उधाण

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
मुंबई
govinda गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता आहुजा यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. गोविंदाचा आगामी ‘रूपा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यात तो कोमल राणी स्वर्णकारसोबत दिसणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने गोविंदा आणि कोमल अनेक ठिकाणी एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चांना सुरुवात झाली होती. त्यातच सुनिता आहुजा यांनी कोमलवर केलेल्या वक्तव्यांमुळेही या चर्चेला अधिक हवा मिळाली. आता गोविंदा आणि सुनिता यांचा विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोघांमधील मतभेद दूर झाल्याच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.
 

govinda and sunita ahuja spotted together at airport amid separation rumours 
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गोविंदा आणि सुनिता आहुजा विमानतळावर एकत्र दिसत आहेत. गोविंदाने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून, सुनिता पेस्टल रंगाचा शर्ट आणि प्रिंटेड जीन्समध्ये दिसत आहे. दोघे हातात हात घालून उभे असल्याचे तसेच फोटोग्राफर्सना एकत्र पोझ देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
काही नेटकऱ्यांनी गोविंदा आणि सुनिता पुन्हा एकत्र आल्याचे म्हटले आहे. एका चाहत्याने त्यांना ‘खूप मस्त कपल’ असे म्हटले, तर दुसऱ्याने ‘जोडी नंबर वन’ अशी प्रतिक्रिया दिली. आणखी एका नेटकऱ्याने दोघे एकत्र खूप छान दिसत असल्याचे सांगत, त्यांच्यात नेमके मतभेद का निर्माण झाले होते, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, तो अलीकडचा आहे की दोघांमधील वादाच्या चर्चांपूर्वीचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार हे अलीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही एकत्र पोहोचले होते. ‘एएनआय’शी बोलताना गोविंदाने यामागचे कारण सांगितले. आपल्या आगामी ‘रूपा’ चित्रपटासाठी भगवान गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्याचे त्याने सांगितले. बराच काळ चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत सक्रिय होत असल्याने चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केल्याचेही त्याने स्पष्ट केले.
गोविंदाने यावेळी आपल्या पूर्वीच्या अनुभवांचीही आठवण सांगितली. याआधी करिश्मा कपूरसोबत मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या चित्रपटांना यश मिळाले होते, असे त्याने नमूद केले. तसेच अभिनेत्री रवीना टंडनसोबतही मंदिरात गेल्याचा उल्लेख त्याने केला. आता पुन्हा चित्रपटसृष्टीत सक्रिय होत असताना ‘रूपा’च्या यशासाठी गोविंदा कोमल राणीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला होता.
विमानतळावरील गोविंदा आणि सुनिताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोघांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना मात्र नवे वळण मिळाले आहे. व्हिडीओमध्ये दोघे एकत्र दिसत असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील परिस्थितीबाबत त्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.