नागपूर,
Handicrafts Exhibition at S.D.D.N.V नागपूर शिक्षण मंडळाद्वारे संचालित श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाच्या दिवाणखान्यात रिपोर्ट डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या हस्तलिखिते आणि हस्तकला वस्तूंच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य माधुरी यावलकर, पर्यवेक्षिका सुषमा पंचभाई, हायस्कूल प्रभारी कीर्ती बालकी यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाच्या बँडसाठी देणगी देणारे तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि नगरसेवक चंद्रकांत खंगार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर धोमणे, सचिव नितेश खापेकर तसेच माता-पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. पल्लवी वारुडकर आणि सचिव सदाफ रशीद अली यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.

इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित माहितीपूर्ण आणि कल्पक हस्तलिखिते तयार करून प्रदर्शनात मांडली. यासोबतच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक गणेशमूर्ती, रंगीबेरंगी राख्या, हस्तनिर्मित कागदी तोरणे आणि माळा यांनाही प्रदर्शनात स्थान देण्यात आले. मान्यवर तसेच पालक-शिक्षक संघ आणि माता-पालक संघाच्या सदस्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर वाचन, लेखन आणि सादरीकरण कौशल्ये विकसित करण्यासही या प्रदर्शनाचा उपयोग झाला. प्रकल्पाधारित शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
प्राचार्य माधुरी यावलकर आणि पर्यवेक्षिका सुषमा पंचभाई यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना सौ. यावलकर यांनी अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना मिळण्यासोबतच विद्यालयाच्या प्रगतीलाही हातभार लागतो, असे सांगितले.प्रमुख पाहुणे चंद्रकांत खंगार यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले तसेच मेहनतीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृती पाहून पालकांनीही समाधान व्यक्त करत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम वीराणी यांनी केले. त्यांनीच उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कलाकौशल्य आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.