बेरोजगारीची दाहकता पुन्हा समोर,, अंगणवाडी भरतीत उच्चशिक्षित

पदवीधर, बी.एड.धारकांमध्ये चुरस, पदव्युत्तर उमेदवार १२वीच्या जागेसाठी रांगेत

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |

 

नागपूर
unemployment सरकारी आणि निमशासकीय नोकरीच्या मर्यादित संधींचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी भरतीत १२ वी उत्तीर्ण ही किमान पात्रता असलेल्या रिक्त पदांसाठी पदवीधर, डी.एड., बी.एड. तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. नागपूरसह संपूर्ण विदर्भातही हेच चित्र असल्याचे जाणकार सांगतात.

unemployment

जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, रिक्त जागांसाठी एका पदामागे ५ ते ७ अर्ज प्राप्त झाल्याने निवडीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या पदांसाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.

 

नागपूर विभागातही यापूर्वी झालेल्या अंगणवाडी, आशा वर्कर आणि शिपाई भरतीत हेच चित्र पाहायला मिळाले होते. नागपूर जिल्हा परिषदेच्या भरतीतही उच्चशिक्षित तरुणींनी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे शिक्षणाशी संबंधित नसलेल्या पदांसाठीही उच्चशिक्षित उमेदवार प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.

उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असताना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी सुसंगत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचे आव्हान कायम आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या स्थिर रोजगाराच्या संधींकडे उच्चशिक्षित उमेदवारही वळत असल्याचे या भरती प्रक्रियेतून दिसून येते.
 
पीएच.डी.धारकासह एलएलबी उमेदवारही रांगेत

उच्चशिक्षित उमेदवारांकडून कमी शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेल्या पदांसाठी अर्ज करण्याचे हे चित्र केवळ अंगणवाडी भरतीपुरते मर्यादित नाही. यापूर्वी राज्यातील विविध भरती प्रक्रियांमध्ये शिपाई आणि तत्सम पदांसाठी पीएच.डी.धारक तसेच कायद्याचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या जागांसाठी आलेले अर्ज आणि त्यामध्ये पदवीधर, डी.एड., बी.एड. तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा सहभाग यामुळे सरकारी नोकरीच्या मर्यादित संधी, वाढती स्पर्धा आणि उच्चशिक्षित उमेदवारांची रोजगारासाठीची धडपड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.