बॉलिवूडशी संबंधित १२ ठिकाणी ‘आयटी’चे छापे

रकुल प्रीत सिंग, वासू भगनानी यांच्यासह अनेकांच्या घर-कार्यालयावर कारवाई

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |

 

मुंबई
it raid on bollywood चित्रपटनिर्मितीच्या कारणासाठी कोट्यवधींचा निधी परदेशात पाठवून करचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईत आयकर विभागाने सोमवारी बॉलिवूडशी संबंधित १२ ठिकाणी छापे टाकले. यात प्रामुख्याने अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, वासू भगनानी त्यांचा मुलगा जॅकी भगनानी आणि त्याच्या पत्नीचे कार्यालय, प्रॉडक्शन हाऊस आणि निवासस्थान यांचा समावेश आहे.
 
rakkul preet singh

अनेक प्रमुख प्रॉडक्शन हाऊस आणि चित्रपट कलाकारांचे घर आणि कार्यालयात जाऊन चौकशी करण्यात आली. चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसे हस्तांतरित केल्याच्या आरोपांची आयकर विभाग चौकशी करत आहे. कर चुकवेगिरी आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरूनही ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. चित्रपट चित्रीकरण, परदेशी वितरण आणि निर्मितीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे परदेशात पाठवले जात असल्याची माहिती आयकर विभागाला संबंधितांनी सादर केलेल्या विवरणपत्रातून मिळाली होती.

 
या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी आणि आर्थिक अनियमितता असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या संदर्भात, मुंबई आयकर विभागाची विविध पथके मुंबईतील अनेक कार्यालये आणि परिसरांमध्ये शोधमोहीम राबवत आहेत. आयकर विभागाने संशयास्पद निधीसंदर्भात १२ ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. चित्रपट प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या नावाखाली कथितरीत्या निधी परदेशात पाठवला जात असल्याचा तपासकर्त्यांना संशय आहे. विभागाची अनेक पथके सध्या कथित परदेशी व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि तपशिलांची तपासणी करत आहेत.