एकही चेंडू न टाकता भारत उपांत्य फेरीत! पण कस?

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India reaches semi-finals without bowling जपानमध्ये सुरू असलेल्या २०२६ आशियाई खेळांमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये होणाऱ्या या सामन्यात मुसळधार पावसामुळे खेळ सुरूच होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, एकही चेंडू टाकला गेला नाही. सामना रद्द झाल्यानंतर भारतीय संघाने थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.याच मैदानावर यापूर्वी पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीची लढतही पावसामुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे पाकिस्ताननेही एकही चेंडू न खेळता उपांत्य फेरी गाठली होती. आता भारताच्या सामन्यालाही पावसाचा फटका बसल्याने भारतीय संघाला पुढील फेरीचे तिकीट मिळाले आहे.आशियाई खेळांपूर्वी भारतीय संघाने सानो येथे यजमान जपानविरुद्ध टी-२० सामना खेळला होता. पावसामुळे हा सामना प्रत्येकी ५ षटकांचा करण्यात आला होता. त्यानंतर रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने जपानचा अवघ्या २ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर भारतीय संघ आशियाई खेळांसाठी नागोया येथे दाखल झाला होता.
 
 
 
ayyar
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यांचा विचार केला तर भारताचे पारडे आतापर्यंत स्पष्टपणे जड राहिले आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या १२ टी-२० सामन्यांपैकी भारताने ११ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. २०२४ मध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान भारताला पराभूत करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या आणि अखेरीस भारताने विजय मिळवला.याशिवाय, या वर्षाच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका झाली होती. या मालिकेत भारताने अफगाणिस्तानचा ३-० असा पराभव करत एकतर्फी वर्चस्व राखले होते.उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारतीय संघाच्या आशियाई खेळांतील पुढील वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
भारतीय क्रिकेट संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, टिळक वर्मा, विपराज निगम, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी.
 
अफगाणिस्तान क्रिकेट संघ
दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक, इम्रान मीर, नजीबुल्ला झदरन, इस्मत आलम, करीम जनात, नांगेलिया खरोती, अब्दुल्ला अहमदझाई, खालिद तानिवाल, मोहम्मद अक्रम, फरीदून दाऊदझाई, फरमानुल्ला साफी, हसन इस्खिल, फैसल शिनोजादा, अरब गुल मोमंद.