मुंबई
Stock Market ईरान आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ तसेच अमेरिकी रोखे उत्पन्नातील तेजी यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा झाला. या घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दीड टक्क्यांहून अधिक खाली बंद झाले. दिवसभरातील या जोरदार पडझडीचा थेट परिणाम कंपन्यांच्या बाजारमूल्यावर झाला असून, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य सुमारे ८ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन अंदाजे ४७४ लाख कोटी रुपयांवर आले.
दिवसअखेर सेन्सेक्स १,१२४.०२ अंकांनी म्हणजेच १.५२ टक्क्यांनी घसरून ७२,७७१.७२ अंकांवर स्थिरावला. निफ्टी ५० मध्येही मोठी घसरण झाली. निफ्टी ३६०.२५ अंकांनी म्हणजे १.५६ टक्क्यांनी खाली येत २२,७८०.२५ अंकांवर बंद झाला. बाजारातील व्यापक विक्रीचे चित्र एनएसईवरील आकडेवारीतूनही स्पष्ट झाले. सुमारे २,७१६ शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर केवळ ८६९ शेअर्समध्ये वाढ नोंदविण्यात आली. ९१ शेअर्सच्या भावात कोणताही बदल झाला नाही.
सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २९ कंपन्यांचे शेअर्स लाल निशाण्यात बंद झाले. एल अँड टी आणि पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये जवळपास ३ टक्क्यांची घसरण झाली. अदाणी पोर्ट्स, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआयच्या शेअर्समध्येही २ टक्क्यांहून अधिक घट झाली. या सर्वसाधारण पडझडीत इन्फोसिस हा सेन्सेक्समधील एकमेव शेअर ठरला, ज्याने किरकोळ वाढ नोंदवली. निफ्टीमध्ये जिओ फायनान्शियल, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल्स, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स हे प्रमुख घसरणारे शेअर्स ठरले. त्याचवेळी डॉ. रेड्डीज लॅब्स आणि इन्फोसिसमध्ये तेजी दिसून आली.
सोमवारची घसरण केवळ काही निवडक क्षेत्रांपुरती मर्यादित राहिली नाही. बाजारातील सर्व प्रमुख सेक्टोरल निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात ३ टक्क्यांहून अधिक घट झाली, तर टेलिकॉम निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी खाली आला. ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेस, एफएमसीजी, मेटल, प्रायव्हेट बँक आणि रिअल्टी क्षेत्रांमध्येही साधारण १ ते २ टक्क्यांची घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांवरही विक्रीचा दबाव कायम राहिला. निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० हे दोन्ही निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी घसरले.ईरान आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. तेलाच्या वाढत्या दरांमुळे महागाईचा दबाव वाढण्याबरोबरच कंपन्यांच्या उत्पादन आणि परिचालन खर्चावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली. त्याचवेळी अमेरिकी बॉन्ड यील्डमध्ये झालेली वाढही शेअर बाजारासाठी दबाव निर्माण करणारी ठरली. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री केली.बाजारातील अस्थिरतेचे प्रमाण वाढल्याचे इंडिया व्हीआयएक्सच्या हालचालीतूनही दिसून आले. सोमवारी इंडिया व्हीआयएक्समध्ये सुमारे १२ टक्क्यांची वाढ झाली आणि तो १४ च्या आसपास पोहोचला. त्यामुळे जागतिक भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकी रोखे उत्पन्नातील तेजी यांचा एकत्रित दबाव भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे जाणवला.