लोकबिरादरी आश्रम शाळेच्या खेळाडू नागपूर विभागात प्रथम

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
भामरागड,
Lok Biradari Ashram School क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत वर्धा येथे झालेल्या शालेय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील 14 वर्षे वयोगटातील खेळाडू विद्यार्थिंनिंनी नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
 

Lok Biradari Ashram School Students Win Nagpur Division Table Tennis Championship 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत वर्धा येथील ओ. एस. जी. टेबल टेनिस अकादमी येथे नुकत्याच विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नागपूर विभागातील आठ जिल्ह्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील, भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील तीन संघाने गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील 14 वर्षे वयोगटातील खेळाडू विद्यार्थिंनीनी उत्कृष्ट कामगिरी केली. नागपूर विभागात सर्वप्रथम नागपूर (ग्रामीण) संघाचा पराभव केला. उपांत्य सामन्यात गोंदीया जिल्हा संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. त्यानंतर नागपूर (शहर) संघाच्या चुरशीच्या सामन्यात दमदार खेळ करत सुवर्ण पदक मिळवले. यामध्ये सलोनी वेलादी, रिद्धी तिम्मा, दीक्षा मडावी, परी पुंगाटी व संगिता लेखामी या खेळाडू विद्यार्थिनींचा समावेश होता. राज्य स्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे.
तसेच 14 व 17 वर्षे मुलांच्या गटात येथील खेळाडू कांस्यपदक विजेते ठरले. सर्व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचे जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी कौतुक केले व राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत असेच यश मिळविण्याच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले. लोकबिरादरी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गिरीश कुलकर्णी, शरीफ शेख, शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी टेबल टेनिस प्रशिक्षक सुनिल आलामी व प्रावीण्यप्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.