नवी दिल्ली,
Manu Bhaker misses out on the final दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या मनू भाकरला २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात पदक मिळवता आले नाही. विशेष म्हणजे, तिला अंतिम फेरीतही स्थान मिळवता आले नाही. दुसरीकडे, याच प्रकारात भारताची ईशा सिंहने दमदार कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. अंतिम फेरीत ईशाला चीनच्या शाओ जियारुईशुआनकडून शूटऑफमध्ये पराभव पत्करावा लागल्याने तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. मनू भाकरने पात्रता फेरीत ५७९ गुणांची नोंद केली आणि ती ११व्या स्थानावर राहिली. अंतिम फेरीसाठी केवळ पहिल्या आठ खेळाडूंची निवड होत असल्याने मनूची पदकाची संधी पात्रता फेरीतच संपुष्टात आली. विशेष म्हणजे, ईशा सिंहने मनूपेक्षा केवळ एक गुण अधिक मिळवत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले.

भारताची आणखी एक खेळाडू राही सरनोबत हिनेही या प्रकारात सहभाग घेतला होता. मात्र, पात्रता फेरीत ती ३०व्या स्थानावर राहिल्याने तिलाही अंतिम फेरी गाठता आली नाही.ईशा सिंहने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच आव्हान कायम ठेवले. सात मालिकांनंतर तिची कामगिरी एका टप्प्यावर घसरली आणि तिने केवळ २६ गुण मिळवले. त्यामुळे ती एलिमिनेशनच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. मात्र, त्यानंतर ईशाने जोरदार पुनरागमन केले. उत्तर कोरियाच्या हयोन सुक किमसोबत तिची तब्बल तीन वेळा शूटऑफ झाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत ईशाने किमवर मात करत आपले पदक निश्चित केले.
ईशा सिंहच्या नावावर या प्रकारातील वर्ल्ड रेकॉर्डही आहे. पदक निश्चित झाल्यानंतर सुवर्णपदकासाठी तिची चीनच्या शाओ जियारुईशुआनसोबत थेट लढत झाली. शेवटच्या मालिकेपर्यंत दोन्ही खेळाडूंची ३८-३८ अशी बरोबरी होती. त्यामुळे सुवर्णपदकाचा निर्णय शूटऑफद्वारे करण्यात आला.शूटऑफमध्येही पहिल्या चार शॉट्सपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. मात्र, निर्णायक क्षणी ईशाचा शेवटचा शॉट लक्ष्यापासून चुकला. त्याचवेळी चीनच्या शाओ जियारुईशुआनने अचूक निशाणा साधत सुवर्णपदक निश्चित केले. त्यामुळे ईशा सिंहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण ३९ पदके जिंकली आहेत. यामध्ये ४ सुवर्ण, १७ रौप्य आणि १८ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताने शूटिंगमध्ये आतापर्यंत १२ पदके मिळवली आहेत. तर सर्वाधिक पदके अॅथलेटिक्समध्ये आली असून भारतीय खेळाडूंनी या क्रीडा प्रकारात आतापर्यंत १३ पदके जिंकली आहेत.