मुंबई
mumbai traffic मुंबईतील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील गेल्या काही काळापासून रखडलेले तीन महत्त्वाचे पूल ऑक्टोबर महिन्यात वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता आहे. यामध्ये ऑगस्ट 2024 पासून बंद असलेला सायनचा रेल्वे पूल, विद्याविहार रेल्वे ओव्हरब्रिज आणि गोरेगावमधील फ्लायओव्हेचा समावेश आहे. हे तिन्ही पूल वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर मुंबईतील विविध भागांमधील वाहतूककोंडीचा ताण कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
सायनचा तब्बल 112 वर्षे जुना रेल्वे पूल ऑगस्ट 2024 पासून वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाच्या कामाला विलंब झाल्याने यापूर्वी कामाची मुदत दोन वेळा वाढवण्यात आली होती. आता 15 ऑक्टोबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूल सुरू झाल्यानंतर सायन परिसरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
प्रवासाला मोठा फायदा होण्याची अपेक्षा
दरम्यान, विद्याविहार रेल्वे mumbai traffic ओव्हरब्रिजचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. गेल्या आठ वर्षांपासून तब्बल 178 कोटी रुपये खर्चून हा चार पदरी उड्डाणपूल उभारला जात आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर घाटकोपर तसेच सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.सायन आणि विद्याविहारसोबतच गोरेगावचा महत्त्वाचा फ्लायओव्हेदेखील ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. गोरेगावमधील हा 1.26 किलोमीटर लांबीचा फ्लायओव्हे दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसराला जोडणार आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्याची लोड टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.गोरेगावचा हा फ्लायओव्हे सुरू झाल्यानंतर पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्यानच्या प्रवासाला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील प्रवासाचा वेळ सध्याच्या सुमारे 75 मिनिटांवरून 25 मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हे तिन्ही पूल महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.