राहुल गांधींकडून जनतेची दिशाभूल

खा. डॉ. अनिल बोंडे यांची टीका

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
अमरावती
mp-dr-anil-bonde लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविल्या जाणाऱ्या एसआयआर आणि ईव्हीएम प्रणालीवर सातत्याने आक्षेप घेऊन जनतेची दिशाभूल करीत आहे. राहुल गांधी देशात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका भाजपा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
 
 
anil bonde
डॉ. बोंडे म्हणाले, निवडणुकांमध्ये लागोपाठ होणाऱ्या पराभवाचे अपयश झाकण्यासाठी आणि स्वतःच्या संघटनव्यवस्थेतील त्रुटी लपवण्यासाठीच राहुल गांधी निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेसारख्या स्वायत्त संस्थांवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. कर्नाटक, तेलंगणा किंवा हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा विजय होतो, तेव्हा निवडणूक आयोग निष्पक्ष वाटतो. मात्र, भाजपचा विजय होताच त्याच संस्थांवर प्रश्न उपस्थित केले जातात, ही काँग्रेसची दुटप्पी वृत्ती आहे.
 
देशात अशांततेचा कट
राहुल गांधी देशात कलह आणि अशांतता निर्माण करू पाहात आहे. घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास उडवून देशाला अस्थिर करणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे. भारताची निवडणूक प्रक्रिया जगात सर्वात पारदर्शक मानली जाते आणि सर्वोच्च न्यायालयानेही तिची वैधता मान्य केली आहे. तरीही परदेशी व्यासपीठांवर व देशांतर्गत सभांमध्ये भारताच्या स्वायत्त संस्थांना बदनाम करून देशाची प्रतिमा मलीन केली जात आहे. नव्या प्रकरणात निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट केल्याने काँग्रेस तोंडावर पडल्याचे डॉ. बोंडे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला भाजपा शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजपा नेते रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे, बादल कुलकर्णी उपस्थित होते.