मुंबई,
sanjay raut on tukaram mundeठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात संजय राऊत यांनी अन्न व सुरक्षा भेसळ याबाबतच्या कारवाईबाबत अभिनंदन करत FDA अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लुटीबाबत तात्काळ कारवाईच्या मागणी केली आहे. तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्त झाल्यानंतर ज्या कारवाया केल्या त्याचं संजय राऊत यांनी अभिनंदन करत काही गोष्टी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
एफडीएतील पदनिर्देशित अधिकारी सहाय्यक आयुक्त तसेच अन्न सुरक्षा अधिकारी उघडपणे हॉटेल, रेस्टॉरंट, क्विक कॉमर्स व्यवसायांना परवाना निलंबनाच्या धमक्या देऊन मोठ्या प्रमाणात वसुली करीत आहेत. हॉटेल व्यावसायिकांना धमक्या, ब्लॅकमेल करून पैसे गोळा करण्याचा हा उद्योग आता पूर्वीपेक्षा जास्त जोमाने सुरू झाला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी पत्रात करत तुकाराम मुंडेंना याबाबत तक्रार केली आहे.
एफडीएचे बांद्रा मुख्यालय, ठाणे कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लुटीचा मुख्य अड्डा आहे. तेथे अधिकारी खुलेआम पैसे मागतात. नागपूर, पुणे, सोलापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर येथील लुटीच्या 'कथा' घेऊन अनेक सामान्य व्यावसायिक मला भेटले, असा धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे.