संत गुलाबराव महाराजांनी विश्वाला धर्म आणि समन्वयाचा विचार दिला

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, माधान येथे आशीर्वाद प्रबोधन

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
चांदूरबाजार
sarsanghchalak-dr-mohanji-bhagwat ‘आशीर्वाद प्रबोधन’ असे या कार्यक्रमाचे नाव असले, तरी खऱ्या अर्थाने संत गुलाबराव महाराजांचा आशीर्वाद घेण्याच्या भावनेनेच मी माधान येथे आलो आहे. संत गुलाबराव महाराजांसारख्या संतांचा जन्म विशिष्ट प्रयोजनासाठी झाला असून, त्यांनी संपूर्ण विश्वाला धर्म आणि समन्वयाचा विचार दिला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 
mohanji
अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरबाजार तालुक्यातील श्री क्षेत्र माधान येथे श्री संत गुलाबराव महाराज संस्थानच्या वतीने सोमवार २८ सप्टेंबर रोजी आयोजित ‘आशीर्वाद प्रबोधन’ कार्यक्रमात संत गुलाबराव महाराजांच्या भक्त परिवाराला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध मोहोड, सचिव साहेबराव मोहोड उपस्थित होते.
 
डॉ. भागवत म्हणाले, संत जन्म घेण्यासाठी ज्या स्थानाची निवड करतात, ते स्थान कधीही छोटे नसते. एखादे गाव केवळ भौगोलिक आकाराने छोटे किंवा मोठे होत नाही, तर तेथील लोकांची गुणवत्ता, निष्ठा आणि आध्यात्मिक अधिष्ठान यामुळे त्या गावाचे महत्त्व निश्चित होते. श्री संत गुलाबराव महाराजांसारख्या महान विभूतीचा सहवास आणि आशीर्वाद माधानला लाभला आहे. त्यामुळे माधान हे स्थान तीर्थक्षेत्रासमान आहे. संत गुलाबराव महाराजांचे कार्य हे ईश्वरी कार्य होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर एका विशिष्ट योजनेतून संत गुलाबराव महाराजांनी आपले कार्य पुढे नेले आणि समाजाला धर्म, अध्यात्म व समन्वयाचा मार्ग दाखविला. संतांच्या विचारांचे चिंतन आणि त्यातून समाजाला दिशा देण्याची गरज असल्याचे सांगत डॉ. भागवत यांनी संत गुलाबराव महाराजांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला परिसरातील भाविक, भक्त आणि नागरिकांची उपस्थिती होती.