सोलापूर
Solapur Drought Crisis सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, माढा तालुक्यातील तुळशी गावातील पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पिण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट संपूर्ण गावच विक्रीला काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत ग्रामसभेत ठरावही करण्यात आला असून, गावाच्या वेशीवर आणि ग्रामपंचायतीच्या भिंतीवर ‘हे गाव विकणे आहे’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.
तुळशी गावातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील विहिरीही कोरड्या पडल्या असून, उपलब्ध जलस्रोत आटल्याने नागरिकांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पाण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही अपेक्षित उपाययोजना होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येत टोकाचे पाऊल उचलले. संपूर्ण गाव विक्रीला काढल्याचा संदेश देणारे फलक गावाच्या प्रवेशद्वारावर तसेच ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी Solapur Drought Crisis नागरिकांना संघर्ष करावा लागत असताना शेतीसाठीही पाणी उपलब्ध नसल्याने गावातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे तुळशी गावातील ग्रामस्थांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.