सोलापूर,
Solapur Droughtसोलापूर जिल्ह्यात चारा टंचाईबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पशुधनाच्या सुरक्षेसाठी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा इतर राज्यात चारा आणि मुरघास वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात सध्या उपलब्ध असणारा चारा साठा पुढील 120 दिवस पुरेल इतका आहे. मात्र, ऐन दुष्काळात बाहेरच्या जिल्ह्यात किंवा राज्यात चाऱ्याची विक्री होऊन स्थानिक पातळीवर भीषण टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमधील पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध राहावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणारा कोणताही चारा किंवा मुरघास जिल्ह्याबाहेर नेण्यास पूर्णपणे मनाई असेल. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन करताना आढळले, तर त्याच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अंतर्गत कठोर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई केली जाईल.
सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर प्रशासनाने घेतलेल्या या पहिल्याच मोठ्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा मिळाला असला, तरी चारा व्यापाऱ्यांवर मात्र या निर्णयामुळे मर्यादा आल्या आहेत. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकार सक्रिय झाले आहे.