मुंबई
ss rajamouli ‘ईगा’, ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक एस. एस. राजामौली आता त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘वाराणसी’ या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. महेश बाबू, प्रियंका चोप्रा जोनस आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ७ एप्रिल २०२७ अशी निश्चित करण्यात आली आहे.
राजामौली यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात तब्बल २५ वर्षांचा दिमाखदार प्रवास पूर्ण केला आहे. या काळात त्यांनी पारंपरिक कथाकथनापेक्षा वेगळ्या पद्धतीने कथा मांडत भव्य दृश्यरचना, प्रभावी व्यक्तिरेखा आणि मोठ्या पडद्याला साजेसे सिनेमॅटिक विश्व यांचा अनोखा मेळ घातला. त्यांच्या कल्पकतेमुळे आणि चित्रपट निर्मितीबद्दलच्या उत्कटतेमुळे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक महत्त्वपूर्ण आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट दिले आहेत.
तेलुगू चित्रपटसृष्टीतून दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे राजामौली आज देशातील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या चित्रपटांमध्ये लार्जर-दॅन-लाईफ मांडणी, भव्य अॅक्शन आणि प्रभावी कथाकथन हे सातत्याने पाहायला मिळते. ‘बाहुबली’ फ्रँचायझीने त्यांच्या कारकिर्दीला वेगळे वळण दिले. या चित्रपटाने देशभरात मोठी लोकप्रियता मिळवण्यासोबतच बॉक्स ऑफिसवरही अनेक विक्रम प्रस्थापित केले.
भारतीय संस्कृती, मूल्ये आणि कथांना भव्य सिनेमॅटिक रूप देण्याची राजामौली यांची शैली त्यांच्या चित्रपटांमधून प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या कामामुळे भारतीय चित्रपटांना देशाबाहेरही मोठे व्यासपीठ मिळाले. भारतीय कथा, संस्कृती आणि भव्य निर्मितीशैलीकडे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात त्यांच्या चित्रपटांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
राजामौली यांच्या उल्लेखनीय ss rajamouli फिल्मोग्राफीमध्ये ‘सिम्हाद्री’, ‘छत्रपती’, ‘मगधीरा’, ‘ईगा’, ‘बाहुबली’, ‘आरआरआर’ आणि ‘बाहुबली: द एपिक’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. भव्य अॅक्शन ड्रामा आणि फँटसीपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या दिग्दर्शकाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड, क्रिटिक्स चॉइस मूव्ही अवॉर्ड, दोन सॅटर्न अवॉर्ड्स, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पाच नंदी पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे सन्मान आहेत. कला क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने २०१६ मध्ये त्यांना पद्मश्रीनेही गौरवले.
आता राजामौली यांचेss rajamouli लक्ष ‘वाराणसी’कडे असून, या चित्रपटातून ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर भव्य आणि वेगळे सिनेमॅटिक विश्व उभे करताना दिसणार आहेत. महेश बाबू, प्रियंका चोप्रा जोनस आणि पृथ्वीराज सुकुमारन या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांसमोर आली. या झलकमुळे चित्रपटाच्या कथानकाविषयी आणि त्यातील भव्य विश्वाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.‘वाराणसी’मध्ये टाइम ट्रॅव्हल या संकल्पनेचा वापर करण्यात आला असून, पहिल्या झलकमधून चित्रपटाचे लार्जर-दॅन-लाईफ स्वरूपही समोर आले आहे. भारतीय संस्कृतीशी जोडलेले ग्लोबट्रॉटिंग अॅडव्हेंचर अशी या चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे. क्लासिक अॅडव्हेंचर चित्रपटांमधील कथनशैली आणि भावनिक टोनचा प्रभाव या सिनेमात पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ७ एप्रिल २०२७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वाराणसी’कडून राजामौलींच्या चाहत्यांसह भारतीय चित्रपटप्रेमींमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.