हिंगणघाट,
tree-cutting हिंगणघाट येथील शहालगडी परिसरातील सार्वजनिक हनुमान मंदिर सेवा समिती संत ज्ञानेश्वर वार्ड इथे मोकळ्या जागेत सुमारे ३०० वर्षे जुने झाडं होते. या झाडाची एक फांदी तोडण्याची परवानगी मागितली. एक फांदी तोडण्याची परवानगी मिळताच झाडच मुळापासुन कापून टाकल्याचा संतापजनक प्रकार येथे घडला. या प्रकरणी वृक्ष प्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
शेजारील मंदिराच्या कळसाच्या छताला झाडाची फांदी स्पर्श करत होती. या एका कारणासाठी मंदिर समितीमधील काही पदाधिकार्यांनी हे झाड कापण्याचे नियोजन केले. तेव्हा समितीचा सदस्य म्हणून सतीश गलांडे यांनी झाड तोडण्याला विरोध केला. गलांडे घरी नसल्याची संधी साधून मंदिर समितीने नगरपालिकेकडे केवळ अडथळा ठरणारी फांदी छाटण्याबाबत निवेदन दिले.
परंतु, निवेदन देण्यापूर्वी त्यांनी परवानगी नसताना काही दिवसा अगोदर या महाकाय वृक्षाचा दुसर्या बाजूचा तब्बल ८० ते ९० टक्के भाग पूर्णपणे कापून टाकला होता. एका बाजूची कत्तल केल्यामुळे झाडाच्या नैसर्गिक समतोल बिघडला आणि ते झाड मंदिराच्या बाजूने वाकले. नगरपालिकेने केवळ एक फांदी तोडण्याची परवानगी दिलेली असताना संपूर्ण झाड नष्ट केले. सध्या या महाकाय वृक्षाची केवळ एकच छोटी फांदी शिल्लक ठेवली आहे. शासनाची फसवणूक करून व खोटे अर्ज करून सार्वजनिक पर्यावरण मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे गंभीर दखलपात्र गुन्हा आहे.
नगर पालिकेने एक फांदी छाटण्याची परवानगी दिली असताना संपूर्ण झाड तोडण्याची घाई का आणि कश्यासाठी असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. वन विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकार्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, तोडण्यात आलेल्या मुख्य शाखांचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी गलांडे यांनी केली आहे.
३०० वर्षांचा हा नैसर्गिक वारसा जपण्यासाठी आणि दोषींवर कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी पुन्हा दोषी असे काही निसर्गद्रोही काम करण्या अगोदर विचार करतील असे कडक दंडात्मक आदेश व्हावे ही अशी आशा शहरातील वृक्षप्रेमींनी व्यक्त केली आहे.