उज्जैनमध्ये शाही मशिदीचा भाग हटविताना तणाव

दगडफेकीनंतर अश्रूधुराचा मारा

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
उज्जैन
ujjain mosque demolition row २०२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान सोमवारी सकाळी गोपाळ मंदिर आणि छत्री चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रस्तावित रुंदीकरणासाठी शाही मशिदीचा अडथळा ठरणारा काही भाग हटविण्याचे काम सुरू असताना अचानक दगडफेक झाल्याने परिस्थिती चिघळली. जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.
 

ujjain mosque demolition row stone pelting, tear gas during road widening 
रस्ता रुंदीकरणासाठी मशिदीचा संबंधित भाग हटविण्याबाबत मशीद समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्यात यापूर्वीच सहमती झाली होती. त्यानुसार पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मशीद समितीचे सदस्य स्वतःच हा भाग हटविण्याचे काम करीत होते. मात्र, काम सुरू असतानाच काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याने परिसरात अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराचा मारा केला. मशिदीचा भाग हटविण्याची कारवाई पाहण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने नागरिकही जमले होते.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही महिला आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडू नये आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांनी महिलांना रस्त्यावरून बाजूला करण्याची कारवाई सुरू केली. या वेळी उज्जैन क्राईम ब्रांचच्या पोलीस स्टेशन प्रभारी इन्स्पेक्टर पुष्पा पांचाळ यांच्या हाताला दुखापत झाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिला आंदोलक पुढे सरकत असल्याने त्यांना सुरक्षितपणे हटविण्यासाठी महिला पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. या कारवाईदरम्यान आंदोलक महिलांनी चादरीचा आधार घेतला होता. महिलांना बाजूला करत असताना चादरीच्या धारदार कडेमुळे इन्स्पेक्टर पांचाळ यांच्या हाताला कापले गेले. त्यांच्यावर घटनास्थळी प्रथमोपचार करून हाताला पट्टी बांधण्यात आली. या घटनेत कोणत्याही महिला आंदोलकाला दुखापत झाली नसून सर्व महिला सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
याबाबत इन्स्पेक्टर पुष्पा पांचाळ यांनी सांगितले की, महिला आंदोलकांना हटविताना त्यांच्या पांघरलेल्या चादरीच्या कडेमुळे आपल्या हाताला कापले गेले. कोणत्याही महिलेला दुखापत झालेली नाही आणि सर्वजणी सुरक्षित आहेत. स्वतःवर तातडीने प्रथमोपचार करण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि त्याच कर्तव्याचा हा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २०२८ मध्ये उज्जैन येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून शहरातील विविध मार्गांच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याच प्रकल्पांतर्गत कंठाल चौक ते गोपाळ मंदिर या सुमारे ९०० मीटर लांबीच्या रस्त्याची रुंदी १५ मीटर करण्याचे नियोजन आहे. या मार्गाच्या विस्तारासाठी रस्त्यात येणारी अतिक्रमणे आणि विविध बांधकामे हटविण्यात येत आहेत. त्याच प्रक्रियेत शाही मशिदीचा काही भागही रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कक्षेत येत असल्याने तो हटविण्याची कारवाई हाती घेण्यात आली.मशिदीचा भाग हटविण्याच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात सुनावणी होणार होती. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईसोबतच या प्रकरणाकडे न्यायालयीन पातळीवरही लक्ष लागले आहे.उज्जैनमधील शाही मशिदीला शंभर वर्षांहून अधिक जुना इतिहास असल्याचे मशीद व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, १७ मार्च १९२५ रोजी सिंधिया राजघराण्याच्या काळात तयार झालेल्या एका दस्तऐवजात जमीन अधिग्रहणानंतर मशिदीचा उर्वरित भाग सुरक्षित ठेवण्याचा उल्लेख आहे. तसेच १९७५ मध्ये रस्ता आणि वाहतुकीच्या दृष्टीने मशीद समितीने आपल्या जागेचा काही भाग दिला होता, असाही समितीचा दावा आहे.
याशिवाय, १३ सप्टेंबर १९८५ रोजीच्या मध्य प्रदेश शासनाच्या अधिकृत राजपत्रात शाही मशिदीची नोंद तसेच तिच्या मोजणीचा सविस्तर उल्लेख असल्याचे मशीद व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी मशिदीचा भाग हटविण्याच्या सध्याच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक दस्तऐवजांचाही संदर्भ महत्त्वाचा ठरत आहे.