आलापल्ली,
Vidarbha Statehood Protest स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अहेरी येथील दानशूर चौकात आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोअर कमिटी सदस्य विलास रापर्तीवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. केंद्र सरकारने तातडीने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.28 सप्टेंबर 1953 रोजी झालेल्या नागपूर करारात विदर्भाच्या विकासासाठी तसेच नोकर्या, विकास निधी, मंत्रिमंडळ आणि विविध महामंडळांमध्ये विदर्भाला ठरावीक वाटा देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, या कराराची अपेक्षित अंमलबजावणी झाली नसल्याने विदर्भावर अन्याय झाल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला. विदर्भाच्या विकासासाठी निधीची तरतूद असूनही रोजगार, सिंचन, उद्योग आणि विकासाच्या बाबतीत विदर्भ मागे राहिला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात नागसेन मेश्राम, उमाजी गोवर्धन, धनराज लोखंडे, मोतीराम दुर्गे, छगन गोवर्धन, अतुल सिंगरूं, कवीश्वर गोवर्धन, समीर इटनकर, ओंकार भुजाडी, प्रशांत डोके, नव्या कविराजवार, कुसुम मुरमुरवार, चांदणी पेंदाम, ज्योती सडमेक आदींसह मोठ्या संख्येने विदर्भवादी नागरिकांची उपस्थिती होती.