मुंबई
ajit-pawar accident दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचविणाऱ्या एका बड्या नेत्याचा येत्या १० ऑक्टोबरला पर्दाफाश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. या नेत्याने एका कार्यक्रमात डिझाइनचा मफलर घातला होता, त्यामुळे आपण त्याला ‘मफलरवाला नेता’ असे संबोधत असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या अपघाताला आठ महिने उलटूनही सरकार आणि सीआयडीकडून अपेक्षित तपास होत नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणातील तांत्रिक तसेच गुन्हेगारी तपासाबाबत प्रश्न उपस्थित करताना त्यांनी एआयबीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याचे म्हटले. अजित पवार यांना लोक विसरतील, असे सरकारला वाटत असेल; मात्र तसे होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘मफलर’च्या मागे एक चेहरा असून त्या व्यक्तीचे नाव आणि छायाचित्र १० ऑक्टोबरच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येईल, असा दावा पवार यांनी केला. व्हीएसआर कंपनीला आणि तिला वाचविणाऱ्या व्यक्तीला संबंधित नेता सत्तेचा वापर करून संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ कोणते पुरावे आहेत, याचा तपशील त्यांनी या पत्रकार परिषदेत उघड केला नाही.
आपण ज्या व्यक्तीविषयी माहिती जाहीर करणार आहोत, तो मोठा नेता असल्याने काही जण मला सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत, असे पवार म्हणाले. मात्र, माझे लोकच माझे संरक्षण करतील, असे त्यांनी सांगितले. १० ऑक्टोबरच्या सादरीकरणाच्या अनेक प्रती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या असल्याचा दावाही त्यांनी केला.
अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासात काही बाबी दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही पवार यांनी केला. विमानातील घडामोडी, ब्लॅक बॉक्स आणि त्याच्या तपासाबाबत यापूर्वी आपण काही मुद्दे उपस्थित केले होते, असे त्यांनी सांगितले. ब्लॅक बॉक्सची शहानिशा सुरू असून तो कॅनडा आणि अमेरिकेला पाठविण्याची मागणी करण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले.