नागपूर,
nagpur रामायण-महाभारतातील व्यक्तिरेखांमधून जीवनदर्शनाचे विविध पैलू उलगडतात, तर स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या क्रांतिवीर व वीरांगणांच्या शौर्यगाथा भारतीय इतिहासाचा गौरव अधोरेखित करतात. याच गौरवशाली इतिहासातील विविध प्रसंगांना युवा कथाकारांनी आपल्या प्रभावी कथनशैलीतून जिवंत केले.
निमित्त होते साहित्य विहार संस्थेच्या मासिक कार्यक्रमांतर्गत आयोजित युवा कथाकथन स्पर्धेचे. शंकरनगर येथील धनवटे सभागृहात रविवारी ही स्पर्धा उत्साहात पार पडली. क्रांतिकारकांच्या कथा, रणरागिणींच्या कथा तसेच रामायण-महाभारतातील कथा असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत इतिहासातील विविध व्यक्तिरेखा आणि प्रसंग श्रोत्यांसमोर प्रभावीपणे सादर केले.
प्रद्युम्न देव याने जिजाऊ आणि झाशीच्या राणीची शौर्यगाथा कथन केली. हृषीकेश सहारे याने ‘लंकादहन’ हा रामायणातील प्रसंग अस्सल वऱ्हाडी भाषेत रंगविला. हर्षल टेकाम याने कर्णाची शोकांतिका मांडली, तर रिद्धी ठाकरे हिने श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग कथारूपात सादर केले. आदित्य पटले याने शहीद भगतसिंग यांच्या क्रांतिलढ्याला उजाळा दिला. आसावरी वानखेडे हिने महाभारतातील अंबेचे उपाख्यान प्रभावीपणे मांडले. वंशिका जुमडे हिने रणरागिणी ताराराणी, तर संगीता बोडखे हिने जिजाऊंचे चरित्र कथनातून उलगडले. अभिनव याने संत ज्ञानेश्वरांचे चरित्र कथात्म शैलीत सादर केले, तर संगीता कंभाले हिने ‘अंजनीची तपस्या’ ही कथा सांगितली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी nagpur आर्किटेक्चर असोसिएशन, दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. उदय गडकरी होते. साहित्य विहारच्या अध्यक्ष डॉ. आशा पांडे, डॉ. श्रीकांत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध लेखिका डॉ. अरुंधती वैद्य आणि डॉ. विनिता हिंगे यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. उदय गडकरी यांनी मराठीला कथात्मक लेखनाची समृद्ध परंपरा लाभल्याचे सांगत कथेतून व्यक्तिरेखा जिवंत करणे ही एक सुंदर कला असल्याचे नमूद केले. डॉ. श्रीकांत गोडबोले यांनी साहित्य विहारचे उपक्रम नवोदित साहित्यिक घडविणारे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. आशा पांडे यांनी केले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि रसिकांची मोठी उपस्थिती होती.