चिखली तालुक्यात दुष्काळग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांचे तातडीने आदेश

पारदर्शकतेसाठी ‘जिओ टॅग’ फोटो बंधनकारक; ३ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांचे निर्देश

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
चिखली 
chikhali-taluka drought चिखली तालुक्यात यंदाच्या २०२६ च्या खरीप हंगामात दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेती पिके आणि फळबागांच्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले आहेत. मदत व पुनर्वसन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून, येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सक्त सूचना चिखली तहसील कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
 

chikhali
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन व्हावे, यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विशेष संयुक्त पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) आणि सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये आणि पारदर्शकता राहावी, यासाठी प्रत्यक्ष शेतातील नुकसानीचे 'जिओ टॅग' (Geo-tagged) फोटो काढणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे.
११ महसूल मंडळांमध्ये दैनंदिन आढावा चिखली तालुक्यातील चिखली, हातणी, धोडप, उदयनगर, अमडापूर, पेठ, एकलारा, चांधई, कोलारा, मेरा खुर्द आणि शेलगाव अटोळ या सर्व ११ महसूल मंडळांतील मंडळ अधिकाऱ्यांना या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी आपल्या अधिनस्त गावांचा दैनंदिन आढावा घेऊन पंचनाम्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे.
३ ऑक्टोबरची डेडलाईन नुकसानीचा शेतकरीनिहाय अहवाल विहित नमुन्यात (एक्सेल शीट तसेच अ, ब, क, ड प्रपत्रात) तयार करून त्याची सॉफ्ट कॉपी ईमेलद्वारे आणि स्वाक्षरीसह हार्ड कॉपी विनाविलंब दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तहसील कार्यालयात सादर करण्याचे स्पष्ट आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
कामात हयगय केल्यास कारवाई सदर कामकाजात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या बाधित शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती मदत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे चिखली तहसीलदार विजय सवडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.