महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल तयार

bullet train: maharashtra’s first steel bridge built in bhiwandi with 54,076 high-strength bolts

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
मुंबई
steel bridge अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात उभारण्यात आला आहे. दिवे-अंजुर गावाजवळ नाशिक महामार्गावर हा १०० मीटर लांबीचा पूल उभारण्यात आला असून, त्याचे वजन तब्बल १,४०५ मेट्रिक टन आहे. महामार्गावरील वाहतुकीवर कमीत कमी परिणाम व्हावा, यासाठी रात्रीच्या वाहतूक बंदच्या कालावधीत पुलाची उभारणी करण्यात आली.
 

bullet train: maharashtra’s first steel bridge built in bhiwandi with 54,076 high-strength bolts 
या पुलाची निर्मिती तमिळनाडूमधील त्रिची येथील कार्यशाळेत करण्यात आली. उभारणीच्या ठिकाणापासून सुमारे १,३०० किलोमीटर अंतरावर तयार झालेली ही विशाल संरचना विशेष ट्रेलरच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणण्यात आली. त्यानंतर भिवंडीतील निर्धारित ठिकाणी संरचनेची जोडणी करून ती प्रत्यक्ष जागेवर बसविण्यात आली.
पुलाच्या निर्मितीवेळी तांत्रिक मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. स्टीलची अचूक कापणी, छिद्र पाडणे, जोडणी आणि रंगकामाची प्रक्रिया निर्धारित निकषांनुसार करण्यात आली. स्टीलच्या प्रत्येक उत्पादन तुकडीची अल्ट्रासोनिक चाचणी घेण्यात आली. तसेच वेल्डिंगच्या कामात सहभागी वेल्डर आणि पर्यवेक्षकांना आंतरराष्ट्रीय वेल्डिंग तज्ज्ञांकडून प्रमाणित करण्यात आले.
१०० मीटर लांबीची ही संरचना जमिनीपासून सुमारे १७.५ मीटर उंचीवर उभारलेल्या तात्पुरत्या आधाररचनेवर जोडण्यात आली. या प्रक्रियेत २२ स्किड अरेंजमेंटचा वापर करण्यात आला. पुलाच्या जोडणीसाठी तब्बल ५४ हजार ७६ टीटीएचएसबी प्रकारचे उच्च क्षमतेचे बोल्ट वापरण्यात आले आहेत. संरचनेची टिकाऊ क्षमता वाढविण्यासोबतच कंपनांचे नियंत्रण करण्यासाठी सी-५ संरक्षक रंगकाम प्रणाली आणि इलॅस्टोमेरिक बेअरिंग्ज बसविण्यात आली आहेत.
जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन हॉलो जॅक्स आणि पूर्वताण दिलेल्या मॅकॅलॉय बारच्या मदतीने स्वयंचलित यंत्रणेचा वापर करण्यात आला. या यंत्रणेद्वारे संपूर्ण पूल निर्धारित ठिकाणी ओढून नेऊन अचूकपणे बसविण्यात आला.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर महामार्ग, द्रुतगती मार्ग, मोठ्या नद्या तसेच रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी अधिक लांबीच्या स्पॅनची आवश्यकता असलेल्या ठिकाणी स्टील पुलांचा वापर करण्यात येत आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण २८ स्टील पूल प्रस्तावित असून, त्यापैकी १६ पुलांचे बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.