आत्मसमर्पित नक्षल भगिनींच्या नव्या आयुष्याला आपुलकीची साथ

भारतीय विचार मंच व विवेक विचार मंचचा पुढाकार; साडी-श्रीफळ देऊन सन्मान

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
गडचिरोली,
surrendered-naxal-women नक्षलवादाचा हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करीत समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या भगिनींच्या नव्या आयुष्याला आपुलकीची साथ देण्यासाठी भारतीय विचार मंच आणि विवेक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आत्मसमर्पित नक्षल भगिनींसोबत हितगुज कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे अनुभव जाणून घेत त्यांचा साडी व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
 

surrendered-naxal-women 
 
गडचिरोली शहरालगत शासन व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने आत्मसमर्पित नागरिकांसाठी वस्ती उभारण्यात आली आहे. याच ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात भगिनींनी नक्षल चळवळीकडे कशा आकर्षित झाल्या, जंगलातील जीवन कसे होते, कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आणि कोणत्या परिस्थितीत हिंसक मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला याबाबत मनमोकळेपणाने अनुभव कथन केले. आत्मसमर्पणानंतर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवनात झालेले सकारात्मक बदलही त्यांनी सांगितले.
 
 
आत्मसमर्पणानंतर मुलांना चांगले शिक्षण मिळत असून त्यांच्या भवितव्याबाबत आता आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. शासन व पोलिस प्रशासनाच्या सहकार्यामुळे कुटुंबाला स्थैर्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आत्मसमर्पित महिला व पुरुषांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोलिस प्रशासन तसेच लॉईड्स मेटल्सच्या सहकार्याने मिळणार्‍या प्रशिक्षण व रोजगारामुळे कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असून आत्मविश्‍वासही वाढत आहे. हितगुजादरम्यान उपस्थितांनी भगिनींच्या अनुभवांवर संवाद साधला. संघर्षमय भूतकाळ मागे टाकून मुख्य प्रवाहातील जीवनाकडे सकारात्मकतेने वाटचाल करणार्‍या कुटुंबांचे चित्र यावेळी समोर आले. कार्यक्रमाला सुनील किटकरू, डॉ. चंदा कोडवते यांच्यासह भारतीय विचार मंच व विवेक विचार मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.