मुंबई
albatya galbatya ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून साकारलेले आणि चिन्मय मांडलेकर यांनी दिग्दर्शित केलेले ‘अलबत्या गलबत्या’ हे लोकप्रिय बालनाट्य आता 1000 प्रयोगांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अद्वैत थिएटर निर्मित या नाटकाने गेल्या अनेक वर्षांपासून बालप्रेक्षकांसह मोठ्यांनाही भुरळ घातली आहे. जवळपास पाच दशकांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने मराठी नाट्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
‘अलबत्या गलबत्या’च्या प्रवासात अनेक उल्लेखनीय विक्रमांची नोंद झाली आहे. अवघ्या 365 दिवसांत या नाटकाचे तब्बल 333 प्रयोग हाऊसफुल्ल झाले. याशिवाय एका दिवसात चार आणि पाच प्रयोग सादर करण्याचा विक्रमही नाटकाच्या नावावर आहे. विशेष म्हणजे, एकाच टीमने एका दिवसात सहा प्रयोग सादर केल्याची नोंदही झाली आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
हे नाटक केवळ बालप्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देतानाच मराठी भाषेचे संस्कार रुजविण्यातही या नाटकाची भूमिका राहिली आहे. नाटकातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली असून, आता ही गाणी स्वतंत्रपणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
चिन्मय मांडलेकर, रत्नाकर मतकरी, समृद्धी पांडे, संचित गायकवाड आणि संस्कारी यांनी लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत तसेच बालकलाकारांनी आपला आवाज दिला आहे. या गीतांचे संगीत अनावरण सोमवार, 28 सप्टेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते 10.30 या वेळेत होणाऱ्या नाटकाच्या प्रयोगानंतर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांच्या हस्ते गीतांचे अनावरण होणार आहे. हजार प्रयोगांच्या दिशेने सुरू असलेल्या ‘अलबत्या गलबत्या’च्या प्रदीर्घ प्रवासात गीतांचे अनावरण हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.