३० सप्टेंबरपासून अनंतराव भिडे जन्मशताब्दी समारोहाचा प्रारंभ

२० डिसेंबरला डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
नागपूर,
anantrao-bhide राष्ट्रसेवेला समर्पित जीवन जगलेले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, उद्योजक आणि विविध सामाजिक संस्थांच्या कार्याला बळ देणारे स्व. अनंतराव भिडे यांच्या जन्मशताब्दी समारोहाचा प्रारंभ बुधवार, ३० सप्टेंबरपासून होणार आहे. अनंतराव भिडे स्मृतिशताब्दी समारोह समितीतर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कळमना मार्गावरील नैवेद्यम इस्टोरिया येथे ‘अनंतराव भिडे स्मृती दिवस’ आयोजित करण्यात आला आहे.
 
anantrao-bhide
 
अनंतराव भिडे यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९२६ रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अकोला जिल्ह्यातील शेगाव येथे झाला. अकोला, वर्धा आणि नागपूर येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एलएल.बी. पदवी प्राप्त केली. वाणिज्य परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक मिळविले होते. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रसेवेच्या विविध कार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
 
लघु उद्योग भारतीच्या स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अल्पावधीत देशभर या संस्थेच्या शाखा विस्तारण्यात त्यांनी योगदान दिले. सेवाभारती, स्वदेशी जागरण मंच, लोक कल्याण समिती, गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार, विवेकानंद मेडिकल मिशन खापरी, नागपूर मॅनेजमेंट असोसिएशन यांसह विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. श्रीराम जन्मभूमी आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात संघावर बंदी असताना त्यांना कारावास भोगावा लागला.
 
नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मुद्रण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी पुढाकार घेतला. ‘तरुण भारत’च्या विकासासाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान आणण्यात त्यांचे योगदान होते. संघकार्य, दैनंदिन शाखा आणि समाजातील व्यापक संपर्क हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते.
 
समितीतर्फे मुख्य जन्मशताब्दी कार्यक्रम रविवार, २० डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला समारोह समितीचे अध्यक्ष व माजी राज्यपाल बनवारीलालजी पुरोहित तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी अनंतराव भिडे यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, देवी अहल्याबाई स्मारक समितीतर्फेही अनंतराव भिडे यांच्या दानशूर आणि सेवाभावी वृत्तीच्या स्मरणार्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यादान, अवयवदान, नेत्रदान, केशदान, समयदान, भूदान, गृहदान, धनदान, अन्नदान, वाहनदान आणि गोदान अशा विविध प्रकारच्या दान उपक्रमांसाठी दानदात्यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. देवी अहल्या मंदिर येथे २५ नोव्हेंबर २०२६ रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पत्र परिषदेत अशोक पत्की, घनशाम कुकरेजा, सुधीर पाठक, चित्राताई जोशी, नीलाताई सप्रे, जयंत पाठक आदी उपस्थित होते.