खरीप दुष्काळाचे पंचनामे सुरू

तातडीने कार्यवाहीचे तहसीलदारांचे आदेश

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
कारंजा लाड,
damage-assessment खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर -१ (प्रथम कळ) लागू झाल्याने तलाठी, कृषि सहाय्यक आणि ग्रामसेवक अशा त्रिस्तरीय सामिती ला नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश तहसीलदार रवी महाले यांनी दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाने २७ सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाधिकार्‍यांना याबाबत सुधारित सूचना जारी केल्या आहेत.त्यानुसार हे आदेश देण्यात आले आहे.त्यामुळे दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे.
 
 
damage-assessment
 
मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ट्रिगर -१ लागू झाल्याने पंचनामे करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी पंचनाम्याचा अहवाल पारंपरिक प्रपत्रानुसार संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त झालेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर आता सुधारित प्रपत्राचा वापर करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पंचनाम्याच्या प्रक्रियेत संबंधित शेतकर्‍याचा फार्मर आयडी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. एखाद्या शेतकर्‍याची फार्मर आयडी उपलब्ध नसल्यास त्याचा आधार क्रमांक संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची माहिती अधिक अचूक पद्धतीने संकलित होऊन नुकसानभरपाईच्या पुढील कार्यवाहीसाठी ती उपयोगी ठरणार आहे.सुधारित प्रपत्रामध्ये गाव, शेतकर्‍याचे नाव, ८-अ उतार्‍यानुसार एकूण क्षेत्र, बाधित गट क्रमांक, बाधित पिकाचे नाव, बाधित क्षेत्र हेटरमध्ये तसेच पिकाच्या नुकसानीची नोंद करण्याची तरतूद आहे.
  
 
त्यामुळे कोणत्या गावात कोणत्या शेतकर्‍याच्या कोणत्या पिकाचे किती क्षेत्र बाधित झाले, याची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे.पंचनाम्यांमधून संकलित झालेली माहिती विहित अ, ब, क आणि ड प्रपत्रांमध्ये तयार करून विभागीय आयुक्तांमार्फत कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात पावसातील मोठ्या खंडामुळे अनेक भागांत सोयाबीन, मूग, उडीद यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत कापूस व तुरीच्या पिकांवरही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या पंचनाम्याच्या प्रक्रियेकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. पंचनामे प्रत्यक्ष शेतपातळीवर अचूकपणे होऊन बाधित क्षेत्राची नोंद झाली, तर पुढील दुष्काळी सवलती, मदत व नुकसानभरपाईच्या कार्यवाहीसाठी त्याचा आधार मिळणार आहे. राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला जााईल
खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर -१ (प्रथम कळ) लागू झाल्याने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविल जाईल. त्याकरिता शेतकर्‍यांनी सहकार्य करावे.
रवी महाले, तहसीलदार कारंजा