मुंबई
drishyam 3 अजय देवगण, जयदीप अहलावत आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दृश्यम 3’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विजय साळगांवकर आणि त्याच्या कुटुंबाची पुढची कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून, गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाला अजून काही दिवस बाकी असतानाच चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्या या क्राइम-ड्रामासाठी शनिवारी उशिरा ॲडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आली. मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत केवळ पहिल्या दिवसासाठी तब्बल 2.20 लाख तिकिटांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ आणि 2022 मध्ये आलेल्या ‘दृश्यम 2’नंतर मालिकेच्या तिसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे. यावेळी ‘दृश्यम 3’ची कथा मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटापेक्षा वेगळी असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केल्याने या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
चित्रपटाचे बजेट सुमारे 80 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. Sacnilkच्या अंदाजानुसार, ब्लॉक सीट्सचा समावेश केल्यास पहिल्या विकेंडपर्यंतच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून ‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’ने 17.07 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई नोंदवली आहे. ब्लॉक सीट्स वगळता मंगळवारी सकाळपर्यंत प्री-सेल्सचा आकडा 10.86 कोटी रुपयांवर पोहोचला होता.
यामध्ये 2 ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसासाठीच 8.81 कोटी रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारच्या बुकिंगला अद्याप वेग मिळणे बाकी असल्याने प्री-सेल्सचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्रातून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शनिवार संध्याकाळपासून मंगळवार सकाळपर्यंत महाराष्ट्रातील ॲडव्हान्स बुकिंग 2.87 कोटी रुपयांवर पोहोचली. त्यानंतर दिल्लीचा क्रमांक असून, तेथे 2.14 कोटी रुपयांची प्री-सेल्स नोंदवली गेली आहे. गुजरातमध्येही चित्रपटाने 63.75 लाख रुपयांची ग्रॉस बुकिंग केली आहे.
शहरनिहाय आकडे पाहिल्यास दिल्लीमध्ये सर्वाधिक 2.14 कोटी रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे. मुंबईतून 1.70 कोटी रुपये, तर पुण्यातून 78.20 लाख रुपयांची बुकिंग झाल्याचे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे प्रदर्शनानंतर ‘दृश्यम 3’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याकडे आता चित्रपटसृष्टीचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.