महाविद्यालयातच विद्यार्थिनीवर चाकू हल्ला

हल्लेखोर विद्यार्थ्याला चोप पोलिसांनी घेतले ताब्यात

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
अमरावती
female-student-stabbed शहरातील नवीन बायपासवर असलेल्या प्रो. राम मेघे महाविद्यालयाच्या परिसरात १९ वर्षीय युवतीवर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवार २९ सप्टेंबरला दुपारी घडली. महाविद्यालयाच्या लॉबीतील जिन्यावर विद्यार्थिनी जात असताना मागून आलेल्या तिच्याच वर्गातल्या विद्यार्थ्याने अचानक तिच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात काहीकाळ प्रचंड खळबळ उडाली. या घटनेच्या पाठीमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
 
stabbed
 
नवीन वानवाणी (१९, रा. सिंदी कॅम्प, नवीवस्ती, बडनेरा) असे हल्ला केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. जखमी युवती नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी दुपारी सुमारे १.३० ते २ वाजताच्या दरम्यान युवती महाविद्यालयाच्या लॉबीतील जिन्यावरून जात होती. त्यावेळी आरोपी तिच्या मागून आला आणि अचानक चाकूने तिच्यावर वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरातील विद्यार्थी व इतर नागरिक घाबरले.
घटनेनंतर आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काही नागरिकांनी आरोपीला मारहाण केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके तसेच बडनेरा पोलिस निरीक्षक हनुमंत यांच्यासह अन्य घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून उपस्थितांकडून प्राथमिक माहिती घेतली. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी आणि जखमी युवती यांच्यात पूर्वीपासून परिचय किंवा कोणता वाद होता का, तसेच हल्ल्यामागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बडनेरा पोलीस व गुन्हे शाखेकडून सुरू असून, विद्यार्थिनीच्या बयाणानंतर अधिक स्पष्टता येणार आहे.