नऊ टक्के विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार

१५ टक्के विद्यार्थी तणावग्रस्त

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
टास्क फोर्सच्या सर्वेक्षणातून निघाले निष्कर्ष
नवी दिल्ली,
findings-from-the-task-forces-survey विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मागील सहा महिन्यांच्या कालावधीत १५ टक्के विद्यार्थी तणावग्रस्त असल्याचे आढळून आले. तर नऊ टक्के विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत आल्याचे देशभरात केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
 
 
findings-from-the-task-forces-survey
 
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने देशभरात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्यांची माहिती टास्क फोर्सकडून गोळा करण्यात आली. विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्नाचा भाग म्हणून सर्वेक्षण करण्यात आले. टास्क फोर्सचा अहवाल ३१ ऑक्टोबर रोजी सादर केला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायलयाने नियुक्त केलेल्या पथकाने या वर्षाच्या सुरुवातीला अंतरिम अहवाल सादर केला.
 
या अहवालात उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी अनुभवत असलेल्या विविध समस्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये सामाजिक भेदभाव, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात होणारा लैंगिक छळ, विधी आणि वैद्यकीय विद्यापीठातील स्त्री- पुरुष भेदभाव, शैक्षणिक सहकार्य, हॉस्टेल कर्फ्यु आणि मोरल पोलिसिंग यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच, नीट आणि जेईई परीक्षांमधील जात वैधता, प्रवेशावेळी जात आधारीत होणारा भेदभाव, ग्रेडिंग, भाषा आणि फॅक्लटीचे लक्ष या गोष्टीही समोर आल्या होत्या.
 
 
टास्क फोर्सने देशभरात केलेल्या सर्वेक्षणात २.४३ लाख विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. यापैकी ६७ टक्के विद्यार्थी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील होते. यापैकी ३४ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये बाहेरून आले होते. १५ टक्के विद्यार्थ्यांनी मागील सहा महिने तणावपूर्ण असल्याचे सांगितले. नऊ टक्के विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे विचार मनात आल्याचे सांगितले.
सुविधा उभारण्याची गरज
५६ टक्के विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन गंभीर विषय व्यवस्थितपणे हताळत असल्याचे नमूद केले तर, ३२ टक्के विद्यार्थ्यांनी संस्थेत समुपदेशन सुविधा नसल्याचे सांगितले. या सर्वेक्षणात रोजगाराशी निगडीत चिंताही विद्यार्थ्यांना भेडसावत असल्याचे समोर आले. या सर्वेक्षनानंतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मदत आणि आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी सुविधा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली.