मंगरूळनाथ,
municipal-council शहरातील आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ऐनवेळी पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये, तसेच पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नगर परिषद मंगरूळनाथ तर्फे शहराच्या पाणीपुरवठा स्रोतांची पाहणी करण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी भाजपा गटनेता गणेश खोडे, शिक्षण सभापती, वीरेंद्रसिंह ठाकूर, पाणीपुरवठा सभापती सुधीर घोडचर, माजी नगरसेवक. सचिन पवार यांच्या उपस्थितीत नगर परिषदेचे प्र. पापू अभियंता श्री. पराग नवरे व कनिष्ठ लिपिक अ. जाकीर यांनी मोजसावंगा लघु प्रकल्प, जोगलदरी लघु प्रकल्प तसेच इंचोरी जनुना प्रकल्पाची पाहणी केली.

मंगरूळनाथ शहराला मोजसावंगा लघु प्रकल्पातून ग्रॅव्हिटीद्वारे पाणी घेऊन पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत मोजसावंगा लघु प्रकल्पामध्ये केवळ ३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने भविष्यात शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी स्थिती पाहणीदरम्यान निदर्शनास आली. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा, धरणांची सद्यस्थिती तसेच आगामी काळातील पाणी वितरणाचे नियोजन याबाबत बारकाईने पाहणी करण्यात आली. उन्हाळ्याच्या काळात शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोरपणे वापर करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेकडून उपाययोजनांचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच नागरिकांनीही पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन नगर परिषद मंगरूळनाथतर्फे करण्यात आले आहे.