मुंबई
mpsc exams महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 3 ऑक्टोबर 2026 पासून नियोजित असलेल्या तीन प्रमुख स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा-2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-2026 या परीक्षा आता नियोजित वेळापत्रकानुसार होणार नाहीत. या तिन्ही परीक्षांच्या सुधारित तारखा आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.
राज्य सेवा मुख्य परीक्षा-2025च्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. या तक्रारी आणि आक्षेपांचा विचार केल्यानंतर आयोगाने संबंधित उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेदरम्यानच 3 ऑक्टोबरपासून प्रस्तावित राज्य सेवा मुख्य परीक्षा-2026 पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती.विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही जनप्रतिनिधींनी आयोगाकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पुनर्मूल्यांकनाची सुरू असलेली प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या मागण्या यांचा सर्वंकष विचार करून आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा-2026सह अन्य दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीने राज्यभरातील परीक्षार्थी आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा केली असून, विविध परीक्षा पद्धती तसेच अधिक प्रभावी आणि चांगल्या प्रक्रियांचाही अभ्यास केला आहे. आदर्श परीक्षा पद्धतीबाबत समितीच्या शिफारशी लवकरच प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.या पार्श्वभूमीवर MPSCने स्थगित केलेल्या तिन्ही परीक्षांचे नवीन वेळापत्रक समितीच्या शिफारशी आणि पुढील निर्णयप्रक्रियेनंतर निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. सुधारित तारखांबाबत आयोग स्वतंत्र सूचना प्रसिद्ध करणार असून, तोपर्यंत उमेदवारांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.