मुंबई
kyani & co मुंबईतील प्रसिद्ध आणि तब्बल 122 वर्षांचा इतिहास असलेल्या Kyani & Co. Cafe वर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अचानक कारवाई केली. तपासणीदरम्यान कॅफेच्या स्वयंपाकघरासह अन्न तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी अस्वच्छतेचे गंभीर प्रकार आढळून आले. या कारवाईनंतर FDAने कॅफेचा FSSAI परवाना निलंबित केला आहे.
FDAच्या पथकाने केलेल्या तपासणीत अन्न तयार करण्याच्या परिसरात उंदराची विष्ठा, जिवंत माश्या आणि मृत झुरळे आढळली. परिसरात मांजरीही आढळून आल्याचे अधिकाऱ्यांच्या तपासणीत समोर आले. इतकेच नव्हे, तर एका रेफ्रिजरेटरमध्ये रक्त आढळल्याने अन्नसाठवणुकीच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तपासणीदरम्यान उघड्या सांडपाण्याच्या मॅनहोलजवळच अन्न तयार केले जात असल्याचेही आढळले. काही खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते, तर कच्चे पीठ वर्तमानपत्राने झाकून ठेवलेले दिसून आले. कच्चे आणि तयार खाद्यपदार्थ स्वतंत्रपणे ठेवण्याबाबतही अनेक त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. FDAच्या मते, अशा परिस्थितीत अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो आणि त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यासाठी ही गंभीर अन्नसुरक्षा व स्वच्छतेची समस्या ठरू शकते.कारवाईनंतर FDAने Kyani & Co. Cafeचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित केला. आवश्यक त्रुटी दूर करून अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होईपर्यंत खाद्यपदार्थांची खरेदी, साठवणूक, विक्री आणि वितरण बंद ठेवण्याचे निर्देश कॅफेला देण्यात आले आहेत.
दरम्यान, क्यानी कॅफेवरील ही कारवाई महाराष्ट्र FDAच्या राज्यव्यापी अन्नसुरक्षा मोहिमेचा भाग आहे. 23 ते 27 सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विविध खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 30 आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
1904 मध्ये सुरू झालेले Kyani & Co. Cafe हे मुंबईतील जुन्या आणि प्रसिद्ध इराणी कॅफेंपैकी एक मानले जाते. दीर्घ इतिहास आणि लोकप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कॅफेमध्ये तपासणीदरम्यान आढळलेल्या अस्वच्छ परिस्थितीमुळे अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.