अनिल कांबळे
नागपूर,
nagpur burglary case इमामवाडा परिसरात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात १७ लाखांची घरफोडी झाली होती. या घरफोडीचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेने तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे मिळालेल्या धाग्यावरून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत चोरीला गेलेले तब्बल १६ लाख ९० हजार २०० रुपयांचे दागिने व अन्य साहित्य हस्तगत करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ ला यश आले. या चोरीतील त्याच्या साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
उंटखाना येथील दहीपुरा लेआउटमध्ये राहणारे मिलिंद नामदेवराव कांबळे (६५) यांच्या घरात ही घरफोडी झाली होती. १२ ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३५ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे २५ तोळे सोन्याचे दागिने, ४० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ७५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला होता.
पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी घटनास्थळापासून चोरट्यांनी वापरलेल्या संभाव्य मार्गांवरील ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यासोबतच तांत्रिक तपासातून संशयिताचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीच्या दागिन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १३६.८०० ग्रॅम दागिन्यांची अंदाजे किंमत १६ लाख ४१ हजार ६०० रुपये, तर ३८.६०० ग्रॅम चांदी हस्तगत केली. अशाप्रकारे एकूण १६ लाख ९० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ताब्यात घेतलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला इमामवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घरफोडीतील अन्य संशयिताचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल, सहायक आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युनिट क्रमांक ४ चे पोलिस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आली.