नागपूर
nagpur it park हजारो तरुणांना रोजगार देणाऱ्या नागपूरच्या आयटी क्षेत्रासमोर आता कचरा, अतिक्रमण आणि सुरक्षेचे गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. आयटी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, अनधिकृत अतिक्रमणे, निकामी वाहने आणि रात्रीच्या वेळी वाढलेले मद्यपान यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे. या परिस्थितीचा परिणाम शहरातील आयटी कंपन्यांच्या कामकाजावर होत असून, काही कंपन्या पुणे आणि बेंगळुरूकडे जाण्याचा विचार करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
एकीकडे नागपुरात रोजगाराच्या संधी वाढविण्याची गरज व्यक्त होत असताना, दुसरीकडे शहरातील महत्त्वाच्या आयटी परिसराची अशी अवस्था होत असेल तर हा गंभीर प्रशासकीय प्रश्न असल्याची चर्चा आहे. ‘स्वच्छ आणि सुंदर नागपूर’चा नारा देणाऱ्या प्रशासनासमोर आयटी पार्कमधील कचऱ्याचे वास्तव मोठे आव्हान ठरत आहे.
कचरा, अंधार आणि मद्यपान; महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
आयटी पार्क परिसरात पुरेसा प्रकाश नसल्याने रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांचा वावर वाढल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर परिसरात जाण्या-येण्यास कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले जात आहे.
कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून, काही कर्मचाऱ्यांना घशात खवखव, अंगदुखी, ताप यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारी जाणवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या आजारांचा थेट संबंध परिसरातील कचऱ्याशी आहे की नाही, याबाबत वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
‘परदेशी क्लायंटसमोर आमची नामुष्की’
आयटी कंपन्यांकडे देश-विदेशातून ग्राहक आणि व्यावसायिक प्रतिनिधी येतात. मात्र कंपनीच्या बाहेर पडताच त्यांना कचरा आणि अस्वच्छ परिसर दिसत असल्याने कंपन्यांची प्रतिमा खराब होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
“NMCच्या पोर्टलवर आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र तक्रार ‘रिझॉल्व्ह’ झाल्याचा रिमार्क दिला जातो; प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल दिसत नाही. आमच्याकडे परदेशी आणि बाहेरील क्लायंट येतात. त्यांना हा कचरा दाखवावा लागतो, ही आमच्यासाठी नामुष्कीची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया पर्सिस्टंट, नागपूरचे सुरक्षा अधिकारी विजय धार्मिक यांनी दिली.
‘हंड्रेड डेज’च्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह?
महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्यासह शहर स्वच्छतेसाठी विविध मोहिमा राबविण्याचे नियोजन केले जात असताना, आयटी पार्कसारख्या रोजगारनिर्मितीच्या महत्त्वाच्या केंद्रातच कचरा आणि अतिक्रमणाचा प्रश्न कायम राहणे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे.
आयटी क्षेत्र हे नागपूरच्या भविष्यातील रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे कंपन्यांना शहरात टिकवून ठेवायचे असेल तर केवळ गुंतवणूक आणि रोजगाराच्या घोषणा पुरेशा नसून, त्यांच्या परिसरात स्वच्छता, पथदिवे, अतिक्रमणमुक्त रस्ते आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.
महापालिका या तक्रारींची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करणार का? कचरा आणि अतिक्रमण कधी हटविले जाणार? पथदिवे कधी सुरू होणार? तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या जाणार, याकडे आता आयटी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.