मुख्यमंत्र्यांसोबत नवनीत राणा यांची चर्चा

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
अमरावती
navneet-rana जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. भातकुली तालुक्यातील निंभा, आसरा, पूर्णानगर, खोलापूर इत्यादी सर्कलमधील विविध गावांसह दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यातील शेतशिवारात जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या.
 
navneet
नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, पिकांचे झालेले नुकसान तसेच शासनाकडून अपेक्षित असलेली मदत याबाबत माहिती घेतली. अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टी, पावसातील अनियमितता आणि प्रतिकूल हवामानामुळे तूर, सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची व्यथा मांडली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेतल्यामुळे प्रशासनानेही नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी भूमिका नवनीत राणा यांनी यावेळी मांडली. बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करून शासनाला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश नवनीत राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवनीत राणा यांनी आभार मानले. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाहणीदरम्यान कृषी अधिकारी प्रमोद खर्चान, तहसीलदार अक्षय मांडवे, पुष्पा सोळंकी, कानडजे, कृषी अधिकारी श्रीकांत उताने, अविनाश देशमुख, प्रमोद वाखे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते हजर होते.